वटवृक्ष भलेही हटवला, देव हटणार नाही!
पर्वरीतील खाप्रेश्वर मंदिर समितीचा वज्रनिर्धार :‘प्रसादातही’ देव राजी नसल्याचे केले स्पष्ट
प्रतिनिधी/ पणजी
पर्वरी येथे उड्डाण पुलाच्या बांधकामात अडसर ठरला म्हणून तेथील वटवृक्ष हटविण्यात आला असला तरी देव खाप्रेश्वर मात्र तेथून हटणार नाही. त्याला कुणीही तेथून हटवू शकणार नाही, असा वज्रनिर्धार देव खाप्रेश्वर मंदिर समितीने केला आहे.
पर्वरीतील सदर शेकडो वर्षे जुना वटवृक्ष उड्डाण पुलाच्या बांधकामात अडथळा ठरू लागला होता. त्यामुळे कंत्राटदाराच्या दृष्टीने तो हटविणे क्रमप्राप्त ठरले होते. मात्र त्यासाठी त्या जागेचा जागेकार देव खाप्रेश्वराच्या भक्तगणांनी प्रखर विरोध केला होता. वटवृक्ष निसर्गनिर्मित तर पूल मानवनिर्मित आहे. त्यामुळे तो हलविता येऊ शकतो. वृक्ष वाचवून किंचित स्थलांतरित करता येऊ शकतो, असा दावा व तेवढीच जोरदार मागणी मंदिर समितीने केली होती.
मंदिराला पर्यायी जागा देण्यापेक्षा पुलाचा खांब स्थलांतरित करा, अशी सूचनाही त्यांनी केली होती. त्यातून हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंतही गेले होते. तेथे खटला चालल्यानंतर शेवटी वटवृक्ष हटविण्यास मान्यता देण्यात आली व कंत्राटदाराने आणि सरकारनेही कुणाच्याही भावनांची कदर न करता सर्वांना गाफील ठेऊन भल्या पहाटे सदर वृक्ष तेथून उपटला.
मात्र हे कृत्य करताना तेथील देव खाप्रेश्वराचे मंदिरही पाडून टाकण्यात आले. त्यामुळे मंदिर समितीने संताप व्यक्त केला असून पर्यायी जागेवर मंदिर बांधण्याचा सरकारचा प्रस्ताव नाकारला आहे. मंदिराचे पुनर्बांधकाम मूळ जागेवरच झाले पाहिजे, असे त्यांना ठामपणे सांगितले आहे. त्या संदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अन्य मंदिरांमध्ये जाऊन घेतलेला कौल ‘प्रसाद’ मूळ जागेच्याच बाजूने होता असे सांगताना देवाच्या कौलानुसार आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले.