स्वधर्म जरी आचरण्यास कठीण असला, तरी तोच निभावणे चांगले
अध्याय तिसरा
माणसाच्या स्वभावानुसार त्याच्या आवडीनिवडी ठरत असतात. हे लक्षात घेऊन मनुष्याने त्यांना महत्त्व देऊन शरण जाऊ नये कारण ह्या आवडीनिवडी परमार्थाच्या मार्गात विघ्न आणणारे शत्रू होत. इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची तीव्र इच्छा मनुष्यास खोट्या सुखाच्या आशेची ओढ लावत असते. विषयांची इच्छा पूर्ण झाली तर ते आणखीन हवेत असे वाटू लागते आणि मिळाले नाहीत तर माणसाला राग येतो. म्हणून विषयांच्या इच्छेला थाराच देऊ नये. त्यांची आठवणही काढू नये. वाट्याला आलेल्या कामाबाबत पुढील श्लोकात भगवंत सांगतात की, वाट्याला आलेले काम कमी प्रतीचे असले, तरी ते करण्यातच कल्याण आहे. परधर्म हा भीतीदायक आहे, स्वधर्मात मरण आले तरी चांगले.
उणा हि आपुला धर्म पर-धर्माहुनी बरा । स्व-धर्मात भला मृत्यु पर-धर्म भयंकर ।।35।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, आपला स्वधर्म जरी आचरण्यास कठीण असला, तरी त्याचेच आचरण करणे चांगले होय. दुसरा करत असलेले कर्म जरी दिसावयास चांगले असले, तरी आपल्याला प्राप्त झालेले कर्म करावे. समजा एखादा ब्रम्हज्ञान जाणणारा मनुष्य जरी गरीब असला, तरी तो दुसऱ्याच्या घरची पक्वान्ने सेवन करणार नाही. दुसऱ्याची पांढरीशुभ्र मनोहर घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात? किंवा आपली धर्मपत्नी रूपाने थोडी कमी असली तरी, तिच्याबरोबर सुखाने संसार करावा हे चांगले त्याप्रमाणे आपला स्वधर्म निभावण्यास कठीण असला, तसे करताना कितीही अडचणी आल्या, तरी आपला स्वधर्मच ह्यालोकी आणि परलोकी सुख देणारा आहे हे लक्षात ठेवावे. दूध आणि साखर याची गोडी सर्वांना ठाऊकच आहे, परंतु ज्याला पोटाचा आजार, आहे त्याला ते कुपथ्यच होय. असे असूनही रोग्याने त्याचे सेवन केले, तर ते पदार्थ कितीही चांगले असले तरी हितकारी होणार नाहीत. त्याप्रमाणे इतरांना जे कर्म योग्य असेल ते कर्म आपणासाठी अयोग्य असू शकते. म्हणून त्याचे आचरण करू नये. स्वधर्माचे आचरण करीत असताना आपला जीव जरी अर्पण करावा लागला, तरी तो यालोकी आणि परलोकात श्रेष्ठ धर्म मानला जातो.
अर्जुनाने भगवंताचे सर्व बोलणे समजून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, देवा ! माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. पाप आणि पुण्य ह्यातला फरक ज्याला कळतो त्याला पाप करावे असे वाटत नसतानाही तो कुणीतरी जबरदस्ती केल्याप्रमाणे पापाचरण का करतो?
मनुष्य करितो पाप कोणाच्य प्रेरणेमुळे । आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा ।। 36।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने देवांना विचारले, जे स्वत:ला ज्ञानी म्हणवितात त्यांना त्यांनी काय करणे उचित आहे हे माहित असूनही विहित मार्ग सोडून भलत्या मार्गाने चाललेले दिसतात, ह्याचे मला आश्चर्य वाटते. बी आणि कोंडा यांचा निवाडा अंधळ्याला करता येत नाही पण डोळस पुरुषही बी आणि कोंडा ह्यात फरक करताना चुकतो. असे का होते? लोक मनापासून पापाचा तिटकारा करतात आणि त्याचाच ध्यास घेऊन बसतात. ज्याला टाळण्याचा प्रयत्न करावा, तेच आपल्याला नेमके शोधीत येते. अशा प्रकारे पापाचरण करण्याविषयी ज्ञानी पुरुषावर कुणाकडून तरी बळजोरी केली जाते, असे का घडते? ते श्रीकृष्णा, कृपा करून मला सांगा. अर्जुनाचा प्रश्न आपणा सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. भगवंतांनी त्यावर दिलेले उत्तर चिंतनीय असून त्याबर हुकूम वागण्यात आपले भले आहे.