आत्मविश्वास उणावला, तरी भारताला कमी लेखता येणार नाही : लाबुशेन
वृत्तसंस्था/ पर्थ
न्यूझीलंडकडून मायदेशात धक्कादायक पराभव पत्करावा लागल्याने भारताचा आत्मविश्वास थोडासा डळमळलेला असेल, परंतु ऑस्ट्रेलिया पाहुण्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही, असे यजमानांचा महत्त्वाचा फलंदाज मार्नस लाबुशेन याने मंगळवारी येथे सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीचा मुख्य आधार असलेल्या लाबुशेनला वाटते की, किवीजविरुद्धच्या पराभवामुळे भारताचा आत्मविश्वास कमी झालेला असेल. ‘त्याचा अंदाज लावणे खरोखर कठीण आहे. कारण ते पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत, फिरकीस पोषक परिस्थितीत खेळले. पण भारत घरच्या मैदानांवर पराभव पत्करून येथे येत आहे असे याआधी माझ्या कारकिर्दीत कधीच घडलेले नाही, असे लाबुशेनने माध्यमांना सांगितले.
मला वाटते की, ही एक चांगली गोष्ट आहे. त्यांचा आत्मविश्वास कदाचित थोडासा उणावलेला असेल. कारण ते कसोटीत विजय मिळवून येथे आलेले नाहीत. न्यूझीलंडकडून ते 3-0 ने हरले आहेत, असे तो म्हणाला. तथापि, भारताकडून मायदेशात आणि परदेशात अशा दोन्ही ठिकाणच्या मालिकांत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाला आत्मसंतुष्ट राहता येणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. भारत हा एक दर्जेदार संघ आहे आणि ते जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहेत. त्यामुळे तुम्ही अशा संघाला कधीही कमी लेखू शकत नाही, असे मत लाबुशेनने व्यक्त केले.