मनात विचार आले तरी त्याविषयी संकल्प करू नये
अध्याय पाचवा
बाप्पा म्हणाले, अति सर्वत्र वर्जयेत अशी आपल्याकडे म्हण असून ती योगाभ्यासाच्या बाबतीतही लागू पडते. साधकाने आहार, झोप, आवश्यक तेव्हढ्या प्रमाणात जरूर घ्यावी पण अति करू नये. ताजे अन्न खावे. तिखट, तेलकट, फार आंबट किंवा कडू पदार्थ टाळावेत. योग्य प्रमाणात झोप घ्यावी. योगाभ्यास करून साधायचं मूळ उद्दिष्ट सतत डोळ्यापुढे ठेवावे व मनाला नीट समजावून सांगावे. एखादं मोठं उद्दिष्ट डोळ्यापुढे असलं की, मनुष्य आपोआप लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ एखाद्याचं घर बांधायचं उद्दिष्ट असेल तर त्यासाठी पैसे साठवताना इतर खर्च बेतानेच करतो. त्याप्रमाणे योगाभ्यास करून गाठायचं उद्दिष्ट खूप महत्त्वाचं असून पल्ला बराच लांबचा आहे याची मनात सतत आठवण ठेवावी व मनाला ताब्यात ठेवावे पण मन चंचल असल्याने ते चहूकडे धावत असते. मनात अनेक विचार येत असतात, त्याबद्दल संकल्प केले जातात, त्याबद्दल बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
संकल्पजांस्त्यजेत्कामान्नियताहारजागरऽ ।
ङनियम्य खगणं बुद्ध्या विरमेत शनैऽ शनैऽ ।। 13 ।।
अर्थ- संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या इच्छांचा त्याग करावा. आहार, जागरण इत्यादिकांचे नियमन करून व बुद्धीचे योगाने इंद्रियसमुदायांचे नियमन करून हळू हळू विषयांच्या बद्दल वाटणाऱ्या आकर्षणापासून सुटका करून घ्यावी.
विवरण- संसारिक वस्तू, व्यक्ती, काल, घटना, परिस्थिती इत्यादींच्या अनुषंगाने मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात. त्या विचारांपैकी जो विचार सुंदर, प्रिय व आवश्यक वाटतो. त्याचा मनुष्य संकल्प करतो परंतु केलेला संकल्प तडीस गेला किंवा न गेला तरी तो मनुष्याला बंधनकारक ठरतो. आपण केलेला संकल्प पूर्ण झालाच पाहिजे या आग्रहाने त्यासाठी निरनिराळे प्रयत्न करून पाहण्याची इच्छा मनात निर्माण होते. इच्छा आल्या की, अपेक्षा आल्या, पाठोपाठ अपेक्षाभंगाचे दु:खही येतंच! या सगळ्याची सुरवात मनात येणाऱ्या विचारातून होते. बरं मनात येणारे विचार काही थांबवता येत नाहीत. पण ते मी पूर्णत्वाला नेईनच या भावनेने संकल्प करण्याचे नक्की थांबवता येते. त्यासाठी कोणतंही कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी संकल्प करायला आपण कर्ते नाही ही भावना मनात पक्की करावी. कर्ता आपण नसून ईश्वर कर्ता आहेत ही भावना दृढ करण्याचे काम काही अनुभव घेतल्यानंतर हळूहळू होत राहते. त्यासाठी हट्टाग्रह उपयोगी नाही कारण मी कर्ता आहे हा समज गेले कित्येक जन्म मनात दृढ झालेला असतो. त्याजागी ईश्वर कर्ता आहे हा विचार ठेवण्यासाठी मनाला बरीच तयारी करावी लागते. एखादा विचार मनात आला आणि ते येतच असतात. असं झालं की, ठीक आहे म्हणावं आणि पुढं जावं. त्याविषयी संकल्प आणि सिद्धी यांच्यामागे जाऊ नये. श्री गोंदवलेकर महाराजही नामस्मरण करताना मनात येणाऱ्या विचारांबद्दल सांगताना म्हणतात, मनात विचार येणारच पण तुम्ही त्यांना फाटे फोडू नका म्हणजे ते आपोआप बाजूला होतील. प्राणायामचा अभ्यास मनावर ताबा मिळवण्यासाठी उपयोगी ठरतो. अशाप्रकारे मनावर उपचार केले की, ते हळूहळू शांत होते. शम म्हणजे मनात विचार आले की, त्यांना संकल्पपूर्तीकडं जाऊ न देता तिथल्यातिथेच झटकून टाकणे व दम म्हणजे आहे त्यात समाधानी राहणे हे आपण पाहिले आहे त्या शमदमाचा सराव करत रहावे.
काही संकल्प वैयक्तिक कारणासाठी, काही संसारिक गोष्टींच्या पूर्ततेसाठी, काही धार्मिक असतात तर काही लोककल्याणकारी असतात पण संकल्प, मग तो कोणत्याही हेतूनं केलेला असो पूर्ण होणं न होणं आपल्या हातात नसतं हे लक्षात घेऊन विचारांना पुढे जाऊ देऊ नये म्हणजे मन हळूहळू स्वस्थ होतं.
क्रमश: