ज्ञानी पुरुषाने कर्तव्य जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय
अध्याय चौथा
भगवंत म्हणाले, ब्रह्म सर्वव्याप्त आहे आणि ज्ञानी पुरुष ब्रह्मस्वरूपच असल्याने तो करत असलेले कर्तव्य म्हणजे ब्रह्माने ब्रह्मप्राप्तीसाठी केलेले कर्म होते. त्यामुळे त्याने केलेले कर्म ब्रह्मात विलीन होते. त्याच्यादृष्टीने कर्म, कर्ता आणि परिणाम ही सगळी त्याचीच रूपे असतात. ती त्याच्यातच मिसळून जातात. यज्ञ म्हणजे कर्तव्यकर्म करणे होय. त्याने कर्तव्य जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय. देवतांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घ्यायचे म्हणून कोणी यज्ञ करतात तर ज्ञानी ब्रह्मरूपच असल्याने त्याने केलेला यज्ञ ब्रह्मात विलीन होतो. देहाची जोपासना ईश्वरी इच्छेनुसार होत आहे असा पूर्ण विश्वास योग्याला असल्याने, तो देहाच्या पोषणाविषयी त्याच्या मनात चिंता नसते. दुसऱ्या प्रकारच्या यज्ञात, ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. भक्ताने देवाची भक्ती करावी ही भक्ताची जबाबदारी असते. ते ती इतकी उत्तम निभावतो की, ती तशीच चालू ठेवायला मिळावी ही आता देवाची जबाबदारी होऊन बसते. म्हणून नामदेव महाराज विठ्ठलाला म्हणतात, मी तुझी पूजा करण्याचा पण केला आहे तो चालवण्याची जबाबदारी तुझीच आहे. ती त्याने तशीच चालू ठेवावी म्हणून देव भक्ताचा योगक्षेम आनंदाने वाहतो. योगक्षेम वाहण्यामध्ये आहे ते सुरक्षित ठेवणे आणि भविष्यात हवे असेल ते पुरवणे ह्याचा समावेश असतो.
काही योगी ध्यान, धारणा, समाधी ह्या माध्यमातून योगाभ्यास करत असतात. त्याबद्दल सांगताना पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, काही योगी ज्ञानेन्द्राrयांना त्यांच्या ताब्यात ठेवतात आणि त्यांना हवे असेल तेव्हाच त्यांचा वापर करून घेतात. त्यासाठी ते त्यांच्या इच्छांची आहुती इंद्रियरुपी अग्नीत देत असतात.
श्रोत्रादी इंद्रिये कोणी संयमाग्नीत अर्पिती । कोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नीत अर्पिती ।।26।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, धारणा-ध्यान-समाधिरूप संयम, हेच योग्यांचे अग्निहोत्र असते. ते करताना ते मूलबंधादिकाच्या मंत्राद्वारा इंद्रियरूपी पवित्र वस्तू वापरतात. वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर, ते संयमरूप कुंडांची रचना करतात. त्यात इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो. त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघाली की, कामक्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी इंद्रियरूपी कुंडातून निघालेल्या पवित्र अग्नीमध्ये आशारूप धूर नाहीसा होतो. आशा नष्ट झाली की, इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात ते विषयांची आहुती देऊन यज्ञ पूर्ण करतात. थोडक्यात मनावर संयम ठेवल्याने इंद्रियांचे त्यांच्यापुढे काही चालत नाही.
समजा माणसाने ठरवले की, मी मिठाईच्या दुकानाकडे अजिबात पाहणार नाही तर डोळ्यांचा नाईलाज होतो. ज्ञानेंद्रिये दाखवत असलेल्या गोष्टी पाहून त्याला त्या हव्यात असे वाटत असल्याने त्या मिळवण्यासाठी त्याचा आटोकाट प्रयत्न सुरु होतो. त्यासाठी अनेक भलेबुरे मार्ग चोखाळले जातात. हे सर्व टाळण्यासाठी, आहे त्यात समाधानी राहण्याची कला ते साध्य करून घेतात त्यातून त्यांना वैराग्य प्राप्त होते. वैराग्य प्राप्त झाले की, योगी इंद्रियांवर संयम करून त्यांना आपल्या ताब्यात आणतात आणि त्यातून स्वत:च्या इच्छेनुसार त्यांच्याकडून कार्य करून घेतात.
क्रमश: