For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेपटीला गाठ बांधली तरी वाघ गप्प!

06:22 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेपटीला गाठ बांधली तरी वाघ गप्प
Advertisement

सलग दुसऱ्यांदा ठाकरे सेना फोडून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोराचे आव्हान दिले आहे. सध्याचे वर्ष हे शिवसेनेचे हीरक महोत्सवी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्म शताब्दीचेही वर्ष आहे. वास्तविक यानिमित्ताने महाराष्ट्रात दोन्ही शिवसेनेने एका जोशात आपला विस्तार करण्यासाठी घोडदौड केली पाहिजे होती. प्रत्यक्षात दरबारी राजकारण आणि फोडाफोडी याच्या पलीकडे त्यांना काहीही करता आले नाही. सर्वसामान्य मराठी माणसासमोरील आव्हाने तीव्र होत असताना सत्तेतील आणि सत्तेबाहेरील शिवसेना कोणाच्याही उपयोगात येत नाही हे सर्वात मोठे वास्तव आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म शताब्दी वर्षात याहून मोठा पराभव नसावा.

Advertisement

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले आणि ते सुद्धा शिवसेनेच्या वर्धापन दिवसाच्या एक दिवस आधी या आनंदात एकनाथ शिंदे यांना फार उकळ्या फुटल्या असतील अशी स्थिती नाही. हे खासदार प्रदीर्घकाळ त्यांच्या संपर्कात होते. त्यांना फोडायचे की नाही याची एनओसी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून आल्याशिवाय त्यांना काही करता येणार नव्हते. जेव्हा ती आली तेव्हाचा मुहूर्त साधला गेला इतकेच. आणखीही आमदार फुटतील, नगरसेवक पदाधिकारी पक्ष सोडतील पण म्हणून दोन्ही शिवसेनेचे अस्तित्व खूप छोटे किंवा खूप मोठे झाले असे मात्र होत नाही. याचे कारण ठाकरे यांची शिवसेना आज ज्या हतबल परिस्थितीला पोहोचली आहे ती त्यांनी स्वत:हून ओढवून घेतलेली आहे. एकेकाळी (2002 पासून) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मुंबई महापालिकेत चमत्कार घडवत असताना मार्मिक साप्ताहिकाचे तत्कालीन कार्यकारी संपादक दिवंगत पंढरीनाथ सावंत यांनी शिवसेनेच्या या यशाबद्दल ‘हितसंबंधितांचे यश’ असे मार्मिक मधूनच लिहिले होते. वास्तविक ती धोक्याची घंटा होती. प्रबोधनकार शिष्य सावंत आपल्या भूमिकेला जागले होते. पण सत्तेच्या धुंदीत त्या इशाऱ्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ होता? साक्षात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मुंबईतील तीच सगळी मंडळी ईडीला घाबरून फुटली. महाशक्तीच्या मदतीने सर्वात आधी सुरतेला पोहोचली. त्यानंतर झालेल्या गवगव्यामुळे आधी बाहेर पडलेल्या 17 आमदारांची संख्या हळूहळू वाढत गेली! जे फुटले त्यांना रोखून उपयोग नाही हे उद्धव ठाकरे यांना त्यावेळी समजले होते. त्यामुळे त्यांनी रोखायचा प्रयत्न केला नाही. उलट दरवाजे सताड उघडे ठेवले. हा त्यांचा कॉन्फिडन्स ज्या शिवसैनिकांच्या जोरावर होता त्याचा पाया कुठेतरी आज कमकुवत झाला आहे.

2024 च्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीने उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहिलेल्या त्या शिवसैनिकाने झुंज देऊन नऊ खासदार, वीस आमदार, 65 नगरसेवक मुंबईत मिळवले. पण, या सैनिकांना निवडणुकीनंतर ठाकरे सेनेने कोणता कार्यक्रम दिला? अलीकडच्या काळात बीएलए नेमण्याच्या पलीकडे काहीही नाही. या दरम्यान मुंबईतील मराठी माणसासमोर अनेक आव्हाने उभी राहिली. ग्रामीण महाराष्ट्रावर मोठे संकट आले. विधानसभा सभागृहातील मिळालेले काही तास गाजवण्यापलीकडे ठाकरे सेना त्यामध्ये कुठेही सक्रिय दिसली नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, संजय राऊत, अनिल देसाई, भास्कर जाधव, अनिल परब, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांची काही वक्तव्ये या काळात आठवतात. पण, पक्षात नेते पदावर असणारे, उपनेते असणारे, संपर्क नेते, संपर्कप्रमुख अशी पदे भूषवणारे लोकांच्या सुखदु:खात कोठे सामील होते? याचा आढावा घेतला तर हे सगळे महाशक्तीला घाबरून दडून बसल्याचे लक्षात येईल. रस्त्यावरचा सैनिक एकाकीपणे कोणाचेही मार्गदर्शन न मिळवता आपल्याला जमेल त्या मार्गाने लढत आहे. म्हणून ठाकरे सेनेचे नाव ठिकठिकाणी घेतले जाते. याउपर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाचा मुंबईतील मराठी माणसांशी किंवा ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी काय संबंध उरला आहे? कोणतीही सत्ता आणि मत्ता हातात नसताना बाळासाहेबांना जे साधता आले ते सत्तेवरून पायउतार झालेल्या पक्षातील या दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या नेत्यांना का साधता येत नाही? कारण ही मंडळी हितसंबंधी मंडळी आहेत. घाबरलेल्या अशा नेत्यांपेक्षा गमावण्यासाठी हातात काही नसणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हातात पक्ष सोपवणे ही बाळासाहेब ठाकरे यांची संकल्पना मोडीत निघाल्याने आणि ज्याच्याकडे चकाकती चारचाकी गाडी, त्याची कुरवाळायची दाढी, असे धोरण राबवले गेल्याने हा पक्ष जनाधार असतानासुद्धा निराधार बनत चालला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक व्यंगचित्र अजरामर आहे. मराठी माणसाच्या हतबल स्थितीला चितारताना त्यांनी वाघाच्या शेपटीला गाठ बांधली होती आणि त्यावर मथळा होता... उठ मर्दा, शेपटीला गाठ बांधताना गप्प का आहेस! सर्वसामान्यांच्या मनात स्फुल्लिंग चेतवण्याची ही नैतिकता बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होती म्हणून लोक त्यांच्या शब्दावर तुटून पडायला तयार असत. हे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना सांगण्याची आवश्यकता नाही. पण, आपल्याभोवती जमा झालेली हितसंबंधी मंडळी दूर करून सर्वसामान्यांना जबाबदाऱ्यांच्या ठिकाणी बसवण्याचे धोरण ते राबवणार नाहीत तोपर्यंत गपगार पडलेल्या नेत्यांच्या अंगाखाली पक्ष पडूनच राहणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात वाईट वेळ अनेकदा आली आणि त्यातून हा पक्ष सावरला तो सर्वसामान्य शिवसैनिकांच्या आणि मराठी माणसांच्या इच्छाशक्तीमुळे! त्या इच्छा शक्तीला बळ द्यायचे असेल तर ठाकरेंना आपल्या सध्याच्या स्थितीला बदलावे लागेल. नेतृत्वाची दिशा बदलावी लागेल, तरच पक्षाची दशा बदलेल.

Advertisement

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.