चार हजार पावले चालले, तरी मेंदू सुदृढ
जर्नल ऑफ अल्झायमर डिसीज’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, तुम्ही दररोज फक्त काही हजार पावले चालत असाल किंवा काही व्यायाम करत असाल तर तुमच्या मेंदूचा आकार वाढू शकतो. मेंदूचा आकार मोठा असल्यास मेंदू निरोगी आहे, असे मानता येईल. त्याचे सर्व न्यूरोट्रान्समीटर योग्यरित्या काम करत आहेत, म्हणजेच डिमेंशिया किंवा अल्झायमरचा धोका नाही. दहा हजारांहून अधिक लोकांवर केलेल्या या अभ्यासानुसार दररोज काही हजार पावले चालणाऱ्यांचा मेंदू इतरांपेक्षा मोठा होता. रोज मध्यम पातळीचा व्यायाम केल्याने मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. त्यासाठी दिवसाला चार हजार पावले चालणेही पुरेसे आहे. दहा हजार पायऱ्यांचे उद्दिष्ट पाहून मागे हटणाऱ्यांना या संशोधनानंतर नवीन ध्येय गाठणे थोडे सोपे होणार आहे. दर आठवड्याला दीडशे मिनिटे हळू किंवा 75 मिनिटे वेगाने चालण्याचे उद्दिष्ट ठेवणे, दोन किंवा अधिक दिवस स्नायूंचा व्यायाम करणे, व्यायाम केल्यानंतर स्ट्रेचिंग करणे, पुरेसे पाणी पिणे आणि पोषक तत्त्वांचे सेवन करणे या तंत्रांचा वापर करण्याचा सल्ला तज्ञ देतात.हालचालींमुळे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढतो. यामुळे मेंदूपर्यंत जास्त ऑक्सिजन पोहोचतो. म्हणजेच त्याला अधिक ताकद मिळते. यामुळे संज्ञानात्मक कार्यदेखील सुधारते. मेंदूमध्ये चांगला रक्तप्रवाह निर्माण झाल्यामुळे मेंदूच्या विकासाशी संबंधित अधिक न्यूरोट्रान्समीटर आणि रसायने बाहेर पडतात. नवीन न्यूरॉन्स लवकर विकसित होतात आणि मेंदूची जोडणीही वाढते. व्यायामामुळे मेंदूतील सूज कमी होते आणि मूडही सुधारतो. हे सर्व मिळून आपल्या मेंदूचे आरोग्य सुधारते. दररोज अर्धा तास चालण्यानेदेखील मेंदू निरोगी राहू शकतो. चालल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सांधेदुखीपासून आराम मिळतो. वजन कमी होते. चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चालल्यामुळे मधुमेही रुग्णांना दिलासा मिळतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीर निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक असते. सकाळच्या ताज्या हवेत वीस ते तीस मिनिटे चालल्याने रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. ‘स्पोर्टस मेडिसीन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, जेवणानंतर पाच-दहा मिनिटेदेखील चालण्याची सवय हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीच नाही, तर रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. दररोज वीस ते तीस मिनिटे चालण्याने तणाव, नैराश्य आणि चिंता यांची पातळी कमी होते. या काळात शरीरात एंडोर्फिन हार्मोनची पातळी वाढते. त्यामुळे तणाव कमी होतो.