दोन महिन्यानंतरही बचाव पथकाला वाघाने दिला चकवा
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि धाराशिव येथे मागील दोन महिन्यांपासून वाघ वावरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी भिती पसरली आहे. यासंदर्भात बचाव पथकाला वाघ चकवा देत आहे. हा वाघ रविवारी बचाव पथकाला पुन्हा एकदा गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे. डार्ट गनच्या माध्यामातून वाघावर निशाणा रोखला होता, मात्र ऐनवेळी अंदाज हुकला. डार्टगनचा शॉट वाया गेला आणि पुन्हा एकदा बचाव पथकाच्या तावडीतून वाघ निसटून जाण्यात यशस्वी ठरला. गेल्या दोन महिन्यांपासून रामलिंगच्या अभयारण्यात मुक्कामी असलेला वाघ कधी सापडणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
टिपेश्वर येथून आलेल्या या वाघाने सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्याच्या हद्दीवर चांगला धुमाकूळ गाजवला आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी १९ डिसेंबर रोजी येडशी येथील पाणथळी लावलेल्या ट्रॅक कॅमेऱ्यात पहिल्यांदा हा वाघ कैद झाला. तेव्हापासून बचाव पथक या वाघाच्या मागावर आहे. यावाघाने वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल २८ पेक्षा अधिक प्राण्यांवर हल्ला केला आहे.