राजकीय सत्तांतरे झाली तरी धोरणांमध्ये बदल नाही
वित्त क्षेत्रातील विश्लेषक चंद्रशेखर टिळक यांचे ‘बुलक’मध्ये प्रतिपादन
बेळगाव : राजकीय सत्तांतरे बदलली तरी देशाच्या धोरणांमध्ये बदल होत नाही. सोने, तेल, कोळसा, शस्त्रs,आयात-निर्यात आणि आज देशात आपल्या रुपयातून होणारा विनियोग, त्याचा आंतरराष्ट्रीय परिणाम आपण लक्षात घेतला पाहिजे. तरच आपल्याला सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात येईल, असे विचार वित्त क्षेत्रातील विश्लेषक व लेखक चंद्रशेखर टिळक यांनी मांडले. लोकमान्य ग्रंथालयप्रणित बुक लव्हर्स क्लबतर्फे चंद्रशेखर टिळक यांनी शनिवारी ‘भारताची विद्यमान राजकीय व आर्थिक परिस्थिती’ या विषयावर व्याख्यान दिले. वरेरकर नाट्या संघाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
चंद्रशेखर टिळक यांनी आपल्या अर्थजगतातील अनुभवांच्या आधारे केलेल्या अभ्यासाची माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी लावलेले टेरिफ यामागेही अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत आहेत. 1991 नंतर भारताने अनेक दूरगामी निर्णय घेतले. त्यामुळेच आज देशात अनेक शस्त्रास्त्रs तयार होत आहेत. भारत शस्त्रास्त्रांमध्ये परिपूर्ण होत असल्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा विचार केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी वाचनालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कोल्हापूर येथील पुस्तकप्रेमी मंडळाचे कृष्णा दिवटे व शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. केदार मारुलकर यांचेही वाचनालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. किशोर काकडे यांनी परिचय व सूत्रसंचालन केले. सहसचिव संजीव जोशी यांनी आभार मानले.
सोन्याचा भाव वाढण्याला आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत
सोन्याचे भाव मागील वर्षभरापासून अस्थिर झाले आहेत. याबाबत त्यांना उपस्थितांमधून प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सोन्याचे भाव अस्थिर होण्यामागे अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत आहेत. अमेरिका यापुढील व्यवहार क्रिप्टो करन्सीमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचवेळी चीनने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच अनेक घडामोडींमुळे सोन्याचे दर सध्या सव्वालाखाच्या घरात पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले.