पूजा केल्या, बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काहीही करू शकत नाही
मंत्री जयकुमार गोरे यांच्चा विरोधकांवर थेट निशाणा
साताराः दहिवडी
महिलेच्या आरोपावरून वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी टोलेबाजी करत आपल्यावर होत असलेल्या आरोपांना जोरदार उत्तर दिले. माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले, जिह्यातले काही लोक सकाळ-संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळया बाहुल्या बांधत आलेत. मात्र, जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काहीही करू शकत नाही, असा इशारा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
माढा लोकसभा मतदारसंघात असलेल्या आणि सातारा-सोलापूर जिह्याच्या सीमेवर असलेल्या माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात शनिवारी रात्री दहा वाजता मंत्री गोरे बोलत होते.
जयकुमार गोरे यांनी तुफान फटकेबाजी केली. अख्खा जिल्हा, अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज नदीकिनारी जाऊन पूजा घालत आहे, काळ्या बाहुल्या रोवतंय. साध्या घरातलं पोरगं, आमदार तीनवेळा झालं. एक निवडणूक अशी झाली नाही, माझ्यावर केस झाली नाही. पण कधीही मी थांबलो नाही. कितीही आडवं या, कितीही दाबायचा प्रयत्न करा, कितीही बाहुल्या बांधा. पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या मागे जनता आहे, तोपर्यंत तुम्ही जयकुमार गोरेचं कधी काहीही करु शकत नाही. कोणाचं वाईट केलं नाही, तर कधीच वाईट होत नाही. जो वाईट करतो, त्याचं चांगलं होत नाही. मी कोणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट बघा. आज जास्त बोलणार नाही. राज्यातील सर्वात दुष्काळी जिल्हा असणारा माण-खटाव पट्ट्यात हा पठ्ठ्या जन्माला आला आहे. माझ्या पाठीमागे देवाभाऊ उभा आहे. माण-खटाव तालुका आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या 32 दिवसांत शेतीचं पाणी तुमच्या बांधावर येईल हे लक्षात ठेवा, असे जयकुमार गोरे यांनी सांगितले.