For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमित शहांच्या दौऱ्यानंतरही सत्ताधाऱ्यांमध्ये बेबनाव

06:53 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमित शहांच्या दौऱ्यानंतरही सत्ताधाऱ्यांमध्ये बेबनाव
Advertisement

. सत्ता पक्षाचे तीन कारभारी निवडणुकीनंतरही आपला दबदबा कायम रहावा या खटपटीत टोक गाठत आहेत. मराठा, धनगर, ओबीसी आरक्षण प्रश्न, शिवपुतळ्याचा प्रश्न आणि नव्याने झालेला एन्काऊंटरचा वाद यातून सत्ता पक्षाला ठाकरे, पवार आणि काँग्रेस विरुद्ध लढायचे की आपसातच? हे ठरवता येईना. गृहमंत्री अमित शहा एकीची बैठक घेऊन गेले खरे. मात्र त्यांची पाठ फिरताच अपमान जनक वक्तव्ये वाढली आहेत. ‘अजितदादांना हे लोक बाहेरचा रस्ता दाखवतील’ हे ठाकरेंचे शब्द सत्तेच्या तंबूत खळबळ माजवत आहेत.

Advertisement

.महाविकास आघाडीचे आव्हान थोपवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना तुम्ही राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहात याची दोन दिवसाच्या दौऱ्यात जाणीव करून दिली. आमदारांना तुमचे तिकीट निश्चित मानू नका. तुमचे सांत्वन करायला कोणी येईल याची वाटही पाहू नका, पाहिजे तर पक्षाच्या प्रचारातही उतरू नका असा स्पष्ट इशारा देऊन अनेक ठिकाणचे उमेदवार बदलण्याचे संकेत दिले. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल असा संदेश दिला. प्रत्यक्षात शब्द आपलाच चालेल हेही दाखवून दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांशी बंद खोलीत चर्चा केली. गेल्या आठवड्यात दादांनी आपण धर्मनिरपेक्षता सोडणार नाही आणि इतर धर्मियांच्याबाबत बोलताना वाचाळवीरांनी सांभाळून बोलावे असे उघड वक्तव्य केले. दादांच्या संभावित दूर जाण्याला शहा यांनी रोखले, असे सांगितले जाते. सगळ्या लोकप्रिय घोषणा अर्थमंत्री म्हणून दादांच्या मुखातून झाल्या असताना त्यांना दूर सारणे उपयोगाचे नाही तसेच भाजपला पुरेशा जागा ठेवूनच शिंदे, पवारांना जागा देण्याचे चाणाक्ष राजकारण अमित शहा करू इच्छितात. मात्र शहांची पाठ फिरताच तीन पक्षाचे नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मूळ वळणावर आले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे आणि पवारांचे पक्ष नवे असल्याचे केलेले वक्तव्य किंवा शिंदे यांच्या पक्षाची मते आम्हाला लोकसभेला मिळाली मात्र अजितदादांची मिळाली नाहीत या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. ज्यामुळे सत्ता सहकारी दुखावण्याची शक्यता अधिक आहे. अजितदादांच्या बाबतीत तर अशी वक्तव्ये ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा या भाजप, संघ आणि अंगीकृत संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मागणीला बळ देणारीच ठरत आहेत. निवडणुकीपूर्वी एका बाजूने शरद पवारांच्या गटातून खुद्द पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार आणि अधेमधे युगेंद्र पवार दादांना डिवचत असतात. त्यात आधी चंद्रकांतदादा आणि आता खुद्द फडणवीस यांनी दादांचा उपयोग झाला नाही हे पुन्हा सांगणे, त्यांना कोपऱ्यात सारले जात असल्याचेच लक्षण. दादा त्यावर पुन्हा उसळून काही बोलणार का हे या आठवड्यात दिसेलच. पण, ज्या पद्धतीने महाविकास आघाडी प्रचाराची आणि प्रत्यक्ष प्रत्येक मतदार संघाच्या लढाईची आखणी करत आहे ती पाहता सत्ताधारी पक्ष त्याच्यावर मात करण्याऐवजी एकमेकांच्या विरोधातच करामती करत असल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा आणि विशेषत: संभाजीनगर दौरा ज्या गांभीर्याने केला ते लक्षात घेता लोकसभेला झालेल्या चुका ते विधानसभेला टाळू इच्छितात हे स्पष्ट दिसत आहे. ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे सत्ताधारी आमदारांच्या विरोधात सक्षम उमेदवारांचे इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू होण्याची लक्षणे आहेत. मराठवाड्यात भाजपने ज्या पद्धतीने अशोक चव्हाण यांचा उपयोग होईल असा विचार करून त्यांना प्रवेश करताच खासदारकीचे बक्षीस दिले होते, त्याचा कोणताही प्रभाव पडलेला दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत एक प्रकारची निराशा आहे. त्यातच खतगावकरांची घर वापसी हा भाजपमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे. नेमक्या निवडणुकीच्या वेळी सुरू झालेली ही गळती अजूनही सत्ताधारी गंभीर्याने घ्यायला तयार नाहीत. त्याचा परिणाम महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे. हर्षवर्धन पाटील, समरजितसिंह घाटगे यांच्या धक्क्या पाठोपाठ मधुकर पिचड आणि त्यांच्या पुत्राने पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणे, रामराजे नाईक निंबाळकर, महादेव जानकर यांची अस्वस्थता वाढणे या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी तंबूत खळबळ उडवून देणाऱ्या आहेत. त्याचे पडसादही उमटत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी केलेले वक्तव्य आणि स्ट्राइक रेट बाबतीत मांडलेला मुद्दा भविष्यात सत्ता पक्षातील वाद किती विकोपाला जाऊ शकतो याचे दर्शन घडवणारच आहे.

Advertisement

घटस्थापनेला उमेदवारी घोषणा?

पितृपंधरवडा संपताच महायुती आणि महाआघाडीकडून निश्चित असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे निवडणूक आयोग आचारसंहिता कधी लावणार याबाबतीत 11 आणि 13 तारखेचे मुहूर्त जाहीर होत आहेत. दुसरीकडे राज्यभर दौऱ्यावर निघालेल्या राज्यपालांमुळे काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लावली जाते की काय? अशी शंका आणि तिसरीकडे उमेदवार बदलाचे शहांचे वक्तव्य यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोणाचे घट बसतात आणि कोणाचे घट उठतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पण सत्तापक्षात माजलेली दुही, जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी दबाव तंत्र याचा कितपत प्रभाव पडतो ते पहायचे.

 सुभेदारांची तिसरी आघाडी

बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यासारख्या चर्चेतील नेत्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली तिसरी आघाडी त्यांच्या सुभेदारीसाठी पोषकच म्हणावी लागेल. वामनराव चटप आणि राजू शेट्टी यांचे ट्यूनिंग शेतकरी आंदोलनातील एक वेगळा कंगोरा पुन्हा एकदा दाखवणारे ठरत आहे. यापूर्वी रिडालोस, वंचित आघाडी आणि त्यापूर्वी मनसे मैदानात उतरल्याने त्या त्या निवडणुकीत जे परिणाम झाले तितके यावेळी या नेत्यांसह राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांना साधता येईल का? याबद्दल साशंकताच आहे. पण राज्यात इतके प्रयोग सुरू आहेत तर त्यात आणखी एक लिटमस टेस्ट का नको? गोंधळ वाढायला असे घटकही निवडणुकीत उपयोगी ठरू शकतात. फक्त यावेळी त्यांची आघाडी कोणाच्या पथ्यावर पडते की सुभेदारीला झळाळी आणते ते पहायचे.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.