महिना झाला तरी विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके मिळेनात
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील स्थिती, गुणवत्तेवर परिणाम
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु महिना होत आला तरी अद्याप शाळांना सर्व विषयांची पाठ्यापुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. प्रत्येक इयत्तेला एखाद दुसऱ्या विषयाचे पुस्तक पोहोचलेले नसल्याने विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या पुस्तकांवर अवलंबून राहावे लागत आहे.
बेळगाव शहर विभागातून पाठ्यापुस्तकांची सर्वाधिक मागणी आहे. शहरात 8 लाख 70 हजार 924 पाठ्यापुस्तकांची आवश्यकता होती. त्यापैकी 90 टक्के पुस्तके वितरीत करण्यात आली असून, उर्वरित पुस्तकांचे अद्याप वाटप झालेले नाही. बेळगाव ग्रामीण गटशिक्षण विभागात 7 लाख 28 हजार पुस्तकांची मागणी होती. यापैकीही 85 टक्के पुस्तकांचा पुरवठा झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हीच परिस्थिती खानापूर तालुक्यातही आहे.
1 जूनपासून राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यापुस्तके मिळावीत, यासाठी मार्च महिन्यापासून पाठ्यापुस्तकांचे वितरण शिक्षण विभागाने सुरू केले होते. परंतु शाळा सुरू होऊन महिला झाला तरी अद्याप सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळू शकलेली नाहीत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे दिसून येत आहे.
केपीएस शाळांना अद्याप मराठीतून पाठ्यापुस्तकेच नाहीत
यावर्षी नव्याने सुरू करण्यात आलेल्या केपीएस शाळांना अद्याप मराठीतून पाठ्यापुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे इंग्रजी पुस्तकांचा आधार घेऊनच अध्यापन सुरू आहे. हायस्कूल विभागातही अद्याप अनेक वर्गांना पुस्तके मिळालेली नाहीत. यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाचा दावा फोल ठरत असून तातडीने पाठ्यापुस्तके वितरीत करण्याची मागणी केली जात आहे.