कुचेलीतील 140 घरे रिकामी करा
उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी : कोणत्याहीक्षणी जमिनदोस्त होणार घरे,स्मशानाच्या जागेतील बेकायदा बांधकामे
म्हापसा : खडपावाडा-कुचेली येथ सरकारने संपादीत केलेल्या जागेत अतिक्रमण करून संपूर्णत: बेकायदेशीररित्या बांधलेली घरे पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कारवाई सुलभ व्हावी, यासाठी ही घरे त्वरित रिकामी करावीत, असा आदेश उपजिल्हाधिकारी कबीर शिरगांवकर यांनी संबंधितांना जारी केला आहे. काहींच्या घरी ही सूचना दारांना चिकटविण्यात आली आहे. त्यामुळे तेथील सर्वांचे धाबे दणाणले आहेत. ही बेकायदेशीर घरे उभारण्यासाठी कोमुनिदादचा प्रतिनिधी, काही नगरसेवक तसेच अन्य दोघा इसमांनी प्रत्येक घरासाठी किमान 10 लाख ऊपयांपर्यंत पैसे उकळले असल्याचे प्रतिज्ञापत्र तेथील लोकांनी एकत्रितपणे आपापल्या सह्यांनिशी वकिलामार्फत तयार केले आहे. याबाबत हे ग्रामस्थ आता त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी लेखी तक्रार पोलिसात करणार असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दै. तऊण भारतला दिली.
सरकारने संपादित केलेल्या या जमिनीत अतिक्रमण करून 140 पक्की घरे बांधण्यात आली आहेत. म्हापसा शहर पीटी शीट क्रमांक 1 चलता क्रमांक 10/3 व पीटी शीट क्रमांक 2 चलता क्रमांक 11/1 मधील सरकारी जमिनीत बेकायदेशीर बांधकामे केल्याबद्दल उपजिल्हाधिकाऱ्यांनी गोवा बांधकाम जमीन बंदी कायदा कलम 6 अन्वये ही सर्व संबंधितांना सूचना जारी केली आहे. ही घरे पाडण्यासाठी अतिक्रमण हटाव पथकाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे बांधकाम पाडण्याचे काम सुरळीत होण्यासाठी जागा खाली करण्याचे निर्देश देण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सूचनेत म्हटले आहे. सरकारने ही जागा सर्वधर्मीय स्मशानभूमीसाठी संपादीत केली होती. वरील दोन्ही क्रमांक मधील सुमारे 31 हजार चौरस मीटर जागेचा त्यात समावेश आहे. गेल्या 7 ऑक्टोबर रोजी सर्व्हे अधिकारी जागा सीमांकनासाठी आले, तेव्हा या ठिकाणी अतिक्रमण करून अवैधरित्या घरे बांधण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
प्रतिज्ञापत्रात पैसे घेतलेल्यांची नावे
दरम्यान येथील नागरिकांनी 16 ऑक्टोबर 2024 रोजी प्रतिज्ञापत्र तयार करून एक स्थानिक नगरसेवक, कोमुनिदाद टेनंट श्रीपाद रामा नाईक, राजा अँथोनी, राजू मांद्रेकर, पालिका सुपरवायझर रमेश राव व कोमुनिदाद कुचेलीचे सदस्य आमानसिओ डिसौझा व बाप्पा धावजेकर तसेच नोर्बट यांनी आम्हाला याबाबत घर कायदेशीर करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय सुंदर निरवडेकर व शेखर वराडकर यांनी सरकारी पातळीकडून ना हरकत दाखला व परवानगी देण्यासाठी आमच्याकडून पैसेही गोळा केले होते असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कुणी किती पैसे घेतले त्याची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत. हे प्रतिज्ञापत्र नोटरायज्ड करण्यात आले आले असून त्याच्या प्रति म्हापसा पोलिसांना सादर केल्या आहेत. याशिवाय चौघांविऊद्ध म्हापसा पोलिसात तक्रार दिली आहे. कुचेली येथील या जागी पाहणीसाठी गेलेले राजेंद्र घाटे म्हणाले की, 35 जणांना नोटिसा हाती दिल्या आहेत बाकी त्यांच्या घराच्या दारावर लावल्या आहेत. ही घरे कधीही जमीनदोस्त होऊ शकतात. दुर्दैव म्हणजे जे हात पैसे घेण्यास पुढे आले होते ते हात आज पाठीमागे फिरले आहेत. ही वोटबँक कुणाची ती पहा. त्यांची लहान मुले आहेत. ही घरे बेकायदेशीरच पण तुम्ही प्रथम बांधायला दिली कशी? स्थानिक नगरसेवक त्यावेळी झोपला होता क्काय? त्याने त्यावेळी तक्रार वा आवाज का केला नाही, असा सवाल राजेंद्र घाटे यांनी केला आहे.