इव्ही निर्मिती : टेस्लासाठी आंध्रप्रदेश उत्सुक
मोदी-मस्क भेटीनंतर वाढल्या हालचाली : राज्यात दक्षिण भागात देणार जागा
वृत्तसंस्था/ हैद्राबाद
अमेरिकेतील टेस्ला या कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्याच देशात भेट घेतली होती. या भेटीनंतर मस्क यांनी भारतामध्ये येण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. याला अनुषंगून आता भारतातील विविध राज्य सरकारांनी त्यांच्यासाठी जागा देण्यासाठी उत्सुकता दर्शविली असल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये आंध्रप्रदेश राज्य आघाडीवर राहिले आहे. भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी टेस्लाने तयारी केली असून एका अहवालानुसार आंध्र प्रदेश राज्याने यासाठी जागा देण्याबाबत तयारी चालविली असल्याचे समजते. राज्यातील दक्षिण भागामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी कारखाना स्थापण्याकरिता जागा देण्यासंदर्भात मस्क यांच्याशी चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे.
आधीपासून प्रयत्न
ऑक्टोबर 2024 मध्ये तेलगू देसम पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने टेस्ला कंपनीसोबत चर्चा सुरु केली होती. मंत्री नारा लोकेश यांनी आपल्या अमेरिकेतील दौऱ्यादरम्यान यासाठी प्रयत्न केले होते. मोदी आणि मस्क यांच्या अलीकडच्या भेटीनंतर आंध्र प्रदेश राज्याने टेस्लासाठी जमीन देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त पुन्हा सुरु केली आहे.
सवलतीसाठी पुढाकार
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार विस्तीर्ण अशी जागा देण्यासोबतच सवलत देण्यासंदर्भातील योजनेचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कंपनी तयार कारची आयात करू शकते आणि नंतर टप्याटप्प्याने या ठिकाणी निर्मिती कारखाना स्थापन करू शकते.