ईव्ही दुचाकी झाल्या 25 टक्क्यांनी स्वस्त
ईव्ही उत्पादकांनी किंमती 25,000 पर्यंत कमी केल्या : बॅटरीच्या किमतीत घट झाल्याचा प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे आता आणखी स्वस्त झाले आहे. अनेक इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी 2-3 महिन्यात विविध मॉडेल्सच्या किंमती 20-25 हजार रुपयांनी (25 टक्के) कमी केल्या आहेत. त्यांनी एंट्री लेव्हल मॉडेल्सच्या किमती सरासरी 15-17 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
किमती कमी करण्यामागील मुख्य कारण म्हणजे दुचाकी ईव्हीची विक्री वाढवून ती अधिक परवडणारी बनवणे. पेट्रोलवरील वाहनांसोबत तगडी स्पर्धा करण्यासाठी इलेक्ट्रिक कंपन्यांनी आपल्या काही मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे या दोन परस्पर विरोधी दुचाकी क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. बॅटरीच्या किमती कमी झाल्याचा फायदा उत्पादकही ग्राहकांना मिळवून देत आहेत.
लिथियम आयन बॅटरीच्या किमतीत घट
ईव्ही बॅटरी तज्ञ आणि ईव्ही एनर्जीचे सीईओ संयोग तिवारी म्हणतात की, भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लिथियमचा साठा सापडल्यानंतर, ईव्ही बॅटरी क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या चिनी उत्पादकांचा बाजारातील हिस्सा कमी होताना दिसत आहे. याशिवाय, लिथियम आयन बॅटरीला पर्याय म्हणून इतर बॅटऱ्याही वेगाने विकसित होत आहेत, त्यामुळे लिथियम आयन बॅटरीच्या किमती घसरत आहेत.
यासह, इलेक्ट्रिक दुचाकी निर्मात्यांनी देखील त्यांच्या मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत जेणेकरून मार्च वर्ष संपण्यापूर्वी आपल्याकडील दुचाकींचा साठा संपवता येईल, असे नियोजन केले जात आहे. फाडाचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया सांगतात की पेट्रोल दुचाकी उत्पादक देखील ई-दुचाकी मॉडेल्स वाढवत आहेत. सध्या त्यांची हिस्सेदारी 5टक्केच्या आसपास आहे. 2-3 वर्षांत त्यात अनेक पटींनी वाढ होणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे.