For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

इथेनॉल खरेदी बंदीने साखर उद्योग संकटात; केंद्र सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी

08:45 PM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
इथेनॉल खरेदी बंदीने साखर उद्योग संकटात  केंद्र सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा   माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी
Advertisement
इंदापूर : प्रतिनिधी : केंद्र सरकारने पुरवठा वर्ष 2026-27 साठी उसाचा रस, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने साखर उद्योगासमोर आर्थिक संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून, केंद्र सरकारने या धोरणाचा फेरविचार करून बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

इथेनॉल प्रकल्पांच्या आर्थिक गणितावर परिणाम

Advertisement

केंद्र सरकारने देशांतर्गत साखरेची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने इथेनॉल खरेदीबाबत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नव्या धोरणानुसार सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी सुरू राहणार आहे. मात्र, सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर 57.97 रुपये असल्याने साखर कारखान्यांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात इथेनॉल प्रकल्पांमध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांची, तर देशभरात सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत इथेनॉल खरेदीवरील निर्बंधांमुळे डिस्टिलरी विभागाचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, या प्रकल्पांसाठी कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांची कर्जवसुली आणि साखर कारखान्यांची कर्जफेड यांवरही परिणाम होऊ शकतो.

Advertisement

बंदी मागे घेऊन दरवाढीची मागणी

साखर उद्योगाचे आर्थिक गणित बिघडू नये आणि इथेनॉल प्रकल्पांची व्यवहार्यता टिकून राहावी, यासाठी केंद्र सरकारने उसाचा रस, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीवरील बंदी उठवावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

याशिवाय, सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर 57.97 रुपयांवरून 70 रुपये करावा, अशीही त्यांची मागणी आहे. केंद्र सरकारने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करून साखर उद्योगाला दिलासा द्यावा, असे पाटील यांनी म्हटले आहे.

साखर कारखाने, इथेनॉल प्रकल्प आणि त्यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर या धोरणाचा काय परिणाम होतो, तसेच केंद्र सरकार याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.