For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इथेनॉलमिश्रित पेट्रोल 1 एप्रिलपासून

06:42 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
इथेनॉलमिश्रित पेट्रोल 1 एप्रिलपासून
Advertisement

केंद्र सरकारचा निर्णय लागू होणार, ‘रॉन 95’ अनिवार्य

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

वीस टक्के मद्यार्कमिश्रित पेट्रोलची विक्री 1 एप्रिलापासून अनिवार्य करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने तसा आदेश लागू केला आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे प्रदूषण कमी प्रमाणात होते. केंद्र सरकारने सर्व पेट्रोलियम कंपन्यांना ही सूचना दिली असून त्यामुळे 1 एप्रिलपासून सर्व कंपन्यांना असे पेट्रोल विकावे लागेल.

Advertisement

सध्याही पेट्रोलमध्ये इथेनॉचे मिश्रण केले जात आहे. तथापि ते कमी प्रमाणात आहे. 1 एप्रिलपासून इथेनॉलचे प्रमाण वाढविण्यात येणार असून ते 20 टक्क्यांपर्यंत नेण्यात येत आहे. साऱ्या देशात आता इथेनॉलमिश्रित पेट्रोलची विक्री केली जाणार आहे. तथापि, या निर्णयाचे क्रियान्वयन झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत देशाच्या विशिष्ट भागांमध्ये इथेनॉलचे मिश्रण न करता पेट्रोल वितरीत करण्याची मुभाही कंपन्यांना देण्यात आली आहे. मात्र, ही मुभा विशिष्ट स्थितीतच दिली जाणार आहे. इथेनॉलच्या मिश्रणामुळे देशातील शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळणार

इथेनॉलची निर्मिती ऊस, मका आदीपासून केली जाते. भारतात ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यांच्यापासून बनणाऱ्या इथेनॉलला आता मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. कारण पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोलमध्ये घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथेनॉलची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या कंपन्या यांना लाभ होईल. उसापासून साखर निर्माण करताना जी मळी उपउत्पादन म्हणून निर्माण होते, तिच्यापासून इथेनॉलची निर्मिती होते.

परकीय चलन वाचणार

इथेनॉल मिश्रणाचा आणखी एक लाभ म्हणजे त्यामुळे भारताला कच्च्या इंधन तेलाची आयात कमी प्रमाणात करावी लागेल. भारताला आपल्या आवश्यकतेच्या 85 टक्के ते 90 टक्के इतक्या प्रमाणात कच्च्या इंधन तेलाची आयात करावी लागते. इथेनॉलचा उपयोग केल्यास ही निर्यात 10 ते 15 टक्के कमी होऊ शकते. कच्चे इंधन तेल खरेदी करताना त्याची किंमत डॉलरमध्ये द्यावी लागते. परिणामी, आयात कमी झाल्यास भारताचे परकीय चलन वाचते, असे तज्ञांचे मत आहे.

‘रॉन 95’ चे महत्त्व

इथेनॉलच्या मिश्रणासमवेतच ‘रॉन 95’ हे गुणवत्ता मानकही अनिवार्य करण्यात येणार आहे. रॉनचा अर्थ ‘रिसर्च ऑक्टेन नंबर’ असा आहे. पेट्रोल जेव्हा वाहनाच्या इंजिनमध्ये जळते त्यावेळी ते कशाप्रकारे जळते, हे या मानकावरून समजते. पेट्रोल अव्यवस्थितपणे (अनइव्हन पद्धतीने) जळत असेल, तर इंजिनातून वेगळ्या प्रकारचा आवाज येतो, ते वाहनाचे मायलेज कमी होते. त्यामुळे इथेनॉलचे मिश्रण वाढविल्यानंतर ‘रॉन 95’ चे गुणवत्ता मानकही लागू करण्यात आलेले आहे.

आपल्या वाहनांचे काय...

भारतात 2023 पासून जी दुचाकी किंवा चारचाकी वाहने निर्माण करण्यात आली आहेत, त्यांची इंजिने 20 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी अनुकूल अशा प्रकारची बनविण्यात आली आहेत. त्यामुळे इथेनॉलचे प्रमाण वाढविले तरी काहीही त्रास वाहनधारकांना होणार नाही, असे पेट्रोलियम विभागाचे म्हणणे आहे. ज्या वाहनांची इंजिने यासाठी अनुकूल नाहीत, त्यांना इंजिनांमध्ये सुधारणा करून घ्यावी लागेल, असे तज्ञांचे मत आहे. 1 एप्रिलपासून यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल.

Advertisement
Tags :

.