महिला दिनी मंगाईदेवी महिला मंडळाची स्थापना
प्रतिनिधी / बेळगाव
महिलांनी धाडस करून अन्यायाविरोधात आवाज उठविला पाहिजे. आपल्या आसापास चाललेल्या चुकीच्या घटनांबद्दल पोलीस खात्याला माहिती दिल्यास पोलिसांना मदत होईल. मग अशा चुकीच्या घटना रोखणे शक्य होईल, असे मत अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती एन. एस. यांनी व्यक्त केले. आनंदनगर दुसरा क्रॉस, वडगाव येथे नव्याने मंगाई देवी महिला मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन व महिला दिन असा संयुक्त कार्यक्रम नाझर कॅम्प येथील जय जवान हॉल येथे पार पडला. त्यावेळी उद्घाटक म्हणून श्रुती एन. एस. बोलत होत्या. व्यासपीठावर शिवानी पाटील, सुधा भातकांडे आदी उपस्थित होत्या.
श्रुती यांनी महिलांना मंडळामध्ये काम कसे करावे, याचे मार्गदर्शन करून आपल्याच बरोबर असा दुराग्रह न करता सर्वानुमते निर्णय घ्या व समाजासाठी काम करा, असे सांगितले. प्रमुख वक्त्या प्रतिभा सडेकर यांनी कुटुंब हे महिलांचे प्राधान्य आहे. परंतु त्यांनी समाजातील समस्यांसाठी आपला वेळ द्यायला हवा. एक स्त्री कुटुंब घडविते तसेच समाजात बदलही घडवू शकते, असे सांगितले.
प्रारंभी स्वागतगीत झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा प्रज्ञा पवार यांनी स्वागत केले. मंडळाची आवश्यकता कशासाठी हे नमूद करून आपल्या परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. रेखा परब यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्र्रज्ञा पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.