सरमळेत भारतीय किसान संघाच्या' ग्राम समितीची स्थापना
अध्यक्षपदी अविनाश गावडे, उपाध्यक्षपदी गुरुनाथ गावडे
ओटवणे : प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध समस्या निवारण्यासह ग्रामीण पातळीवर शेतीविषयक चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सरमळे येथे 'भारतीय किसान संघाच्या' ग्राम समितीची स्थापना करण्यात आली. या ग्राम समितीच्या अध्यक्षपदी अविनाश गावडे, ग्राम समिती उपाध्यक्षपदी गुरुनाथ गावडे तर सचिवपदी संतोष सरमळकर यांची निवड करण्यात आली.सरमळे श्री सपतनाथ मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत, जिल्हा मंत्री अभय भिडे, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष युवराज ठाकूर, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपांकर गावडे आदी उपस्थित होते.यावेळी तानाजी सावंत यांनी भारतीय किसान संघाची कार्यपद्धतीची त्रिसूत्री म्हणजे संरचनात्मक काम, संघटन व संघर्ष याविषयी मार्गदर्शन केले. अभय भिडे यांनी गावातील प्रत्येक शेतकऱ्याने या ग्राम समितीत सहभागी व्हावे असे आवाहन केले. 'भारतीय किसान संघाच्या' सदस्यपदी नाना गावडे, जनार्दन माधव, महेश संभाजी सावंत, शंकर गावडे, बाबू परब, प्रकाश सावंत, सूर्यकांत सावंत यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्राम समिती सोबतच कृषी विभागाच्या 'आत्मा' अंतर्गत शेतकरी गट स्थापन करण्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी ठरवले. या बैठकीत काजू, सुपारी, नारळ, नाचणी केळी, भात अशा विविध प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे संघटन करण्याचा निर्धार उपस्थित शेतकऱ्यांनी केला.