आदिवासी समाजासाठी नव्या संघटनेची स्थापना
‘उटा’ व ‘गाकुवे’चे एकत्रीकरण : काणकोणात उद्घाटन सोहळा,संघटनेच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही : गोविंद गावडे
काणकोण : आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढण्याकरिता ‘उटा’ आणि ‘गावडा कुणबी वेळीप’ (गाकुवे) या दोन्ही संघटनाचे एकत्रीकरण करून नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली असून त्याचा शुभारंभ काणकोणमधून झाला. श्रीस्थळ येथील जीएम गार्डनच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला काणकोण मतदारसंघातील जवळजवळ एक हजार समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या. या नव्या संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास गावडे यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या संघटनेच्या उद्घाटन सोहळ्याला प्रियोळचे आमदार तथा माजी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, माजी सहकारमंत्री प्रकाश वेळीप, दुर्गादास गावडे, मालू वेळीप, सतीश वेळीप, पैंगीणच्या जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप, मोलू वेळीप, खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर आणि विश्वास गावडे उपस्थित होते. यावेळी समई प्रज्वलित करून आणि चिन्हाचे अनावरण करून नव्या संघटनेची घोषणा करण्यात आली.
गावडा, कुणबी, वेळीप ही ‘उटा’ची शक्ती असून काही लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘उटा’मध्ये लाथ मारेन त्या ठिकाणी पाणी काढण्याची ताकद आहे. युक्ती आणि शक्तीच्या बळावर हा समाज आज पुढे आलेला आहे. हे लोक भीक मागत नसून कायद्याने मिळणारा हक्क मागत आहेत. आपण कोणाला घाबरत नसून काही ढोंगी लोक स्वत:च्या स्वार्थासाठी आणि हा समाज संपविण्यासाठी पुढे येत आहेत. ‘उटा आणि फुटा’ अशी टिंगल या लोकांनी केली. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे, असे मत गोविंद गावडे यांनी व्यक्त केले. यावेळी परिवर्तन यात्रा, ‘उटा’चे आंदोलन यासंबंधीची सविस्तर माहिती देताना सरळ नाव घेऊन त्यांनी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. आदिवासी समाजाला शिक्षणाच्या बाबतीत ज्या सवलती मिळाल्या त्याच्या आधारे आज समाजातील मुले उच्च शिक्षण घेऊन पुढे येत आहेत. त्यामुळे ज्या व्यक्ती संघटनेच्या आड येतील त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा गावडे यांनी दिला.
आदिवासी समाज संघर्षातून पुढे आलेला असून समाजाचे काही नेते पाय ओढण्याचे काम करत आहे. त्यामुळे ही संघटना वाड्यावाड्यावर जाऊन जागृती करणार असल्याचे विश्वास गावडे यांनी सांगितले, तर दुर्गादास गावडे यांनी समाजात फूट पाडण्याचे काम ज्या व्यक्ती करत आहेत त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. सूत्रसंचालन आनंद वेळीप यांनी केले. संगीता गावकर, मीना गावकर, नेहा वेळीप, प्राची वेळीप, सूचना गावकर, सुवर्णा वेळीप, शोभा गावकर, स्वाती गावकर, अश्विनी गावकर, प्रांजली गावकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. या कार्यक्रमाला माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक, नगरसेवक शुभम कोमरपंत खास उपस्थित होते. दया गावकर यांनी स्वागत केले, तर अर्जुन गावकर यांनी आभार मानले.
सतत अन्यायामुळे नवीन संघटना : वेळीप
आदिवासी समाजावर सतत अन्याय व्हायला लागला म्हणून नवीन संघटनेची स्थापना करावी लागली. समाजाला एकत्र आणताना आणि युवाशक्ती, महिलाशक्ती यांना संघटित करतानाच अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी ही नवी संघटना वावरणार आहे, असे सांगून आदिवासी कल्याण खात्याकडून योग्य तसे काम होत नसल्याचा आरोप प्रकाश वेळीप यानी केला. त्याचबरोबर रामा काणकोणकर यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्यामागचा ‘मास्टर माईंड’ कोण याचा शोध लावण्याची मागणी त्यांनी केली.