For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीवनावश्यक वस्तू पर्यायी मार्गाने चिपळुणात

11:47 AM Jun 18, 2025 IST | Radhika Patil
जीवनावश्यक वस्तू पर्यायी मार्गाने चिपळुणात
Advertisement

चिपळूण :

Advertisement

पाटण तालुक्यातील वाजेगाव येथील पूल वाहून गेल्याने चिपळूण-कराड मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरून चिपळुणात येणारा भाजीपाला, चिकन, अंडी, दूध वाहतुकीच्या गाड्या येरफळे फाटा, आंबा घाट, महाबळेश्वर, भोर, सातारा-मेढा आदी वेगवेगळ्या पर्यायी मार्गाने येथे मंगळवारी आल्या. त्यामुळे पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. नियमित वेळेपेक्षा गाड्यांना थोडा उशीर होत आहे. शिवाय दरही स्थिर असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

चिपळूणचा विचार करता भाज्या, चिकन, अंडी, दूध यांच्यासह बहुतांशी किराणा साहित्याचा पुरवठा कराड व आसपासच्या भागातून होतो. त्यामुळे दिवसाला अनेक मोठी वाहने कराडहून येथे माल घेऊन येत असून येथील काही व्यापाऱ्यांची वाहने माल आणण्यासाठी कराडला जातात. त्यामुळे चिपळूण आणि कराड हे आर्थिक उलाढालीचे मोठे समीकरण मानले जाते. असे असताना सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाजेगाव येथील पूल वाहून गेला. यामुळे चिपळू-कराड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. यामुळे आता शहरासह तालुक्याला वरील साहित्याचा पुरवठा कसा होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. मात्र येथील व्यावसायिकांनी पूल वाहून गेल्याची माहिती मिळताच आपले साहित्य येथे घेऊन येण्यासाठी सर्व बांधणी केली. त्यानुसार भाज्या, चिकन, अंडी, दूध आदी साहित्य घेऊन येणारी वाहने पाटण येथील येरफळे फाटा, आंबा घाट, महाबळेश्वर, भोर, सातारा-मेढा आदी पर्यायी मार्गाने येथे आली. त्यामुळे नियमित वेळेपेक्षा 1 तास उशिराने ही वाहने येथे आली. पर्यायी मार्ग विचारात घेता 60 ते 100 किलोमीटरचा फरक पडल्याने साहजिकच नेहमीच्या भाड्यात वाढ झाली. मात्र तरीही आम्ही या वस्तूंच्या किंमतीत कोणतीही वाढ केली नसल्याचे भाजी व्यावसायिक सुधीर शिंदे, मटण, चिकन विक्रेते बिलाल पालकर, इम्रान पालकर यांनी सांगितले.

Advertisement

  • कराड मार्ग बंदचा चिपळूण आगाराला फटका

वाजेगावमधील पूल वाहून गेल्याने चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली मार्गे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानुसार चिपळूण आगाराने मंगळवारी या मार्गावर सोडण्यात येणाऱ्या 9 फेऱ्या रद्द केल्या. तर पुणे मार्गावरची बस ताम्हिणीमार्गे वळवण्यात आली. पुलाचा भराव वाहून गेल्याच्या प्रकारानंतर चिपळूण आगाराच्या अडकून पडलेल्या बसेस या पुन्हा पाटणहून त्या-त्या मार्गे रवाना झाल्या.
आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असताना या पावसाचा सार्वाधिक फटका चिपळूण-कराड मार्गाला बसला. सोमवारी वाजेगाव येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्लीमार्गे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेनंतर चिपळूण आगाराने त्या मार्गे जाणाऱ्या 3 फेऱ्या रद्द केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मंगळवारी हा मार्ग सुऊ न झाल्याने या कारणास्तव चिपळूण आगाराने आठ फेऱ्या रद्द केल्या. यामध्ये पहाटे 5 ची गोवळकोट-मिरज, 6 वाजताची माजलगाव, स. 7.30 वाजताची नाशिक, सकाळी 8.15 वाजता सुटणारी संभाजीनगर, स. 9.30 वाजताची पुणे, दुपारी 12.30 वाजता तासगाव, 3 वाजताची सोलापूर व बेळगाव, तर रात्री 9.30 वाजताची अक्कलकोट या नऊ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. याबरोबरच दुपारी 2 वाजताची पुणे बस ताम्हिणी मार्गे, तर मिरज फेरी देवरुखमार्गे वळवण्यात आली. तसेच पुलाचा भराव वाहून गेल्याच्या प्रकारानंतर चिपळूण आगाराच्या अडकून पडलेल्या बसेस या पुन्हा पाटणहून त्या-त्या मार्गे रवाना करण्यात आल्या. दरम्यान, बदललेल्या मार्गामुळे अंतर वाढल्याने तिकीट दरात वाढ झाली आहे. तसेच रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे चिपळूण आगाराचे सुमारे 70 हजारांचे नुकसान झाले.

Advertisement
Tags :

.