रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आता ईएसआय-पीएफ नोंदणी
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची माहिती : जवळपास 7 कोटी लोकांना लाभ होणार
नवी दिल्ली :
रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या सात कोटी लोकांसाठी ईएसआयसी आणि भविष्य निर्वाह निधी नोंदणीची हमी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. कमी प्रदूषणासह जलद बांधकाम प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत नवीन स्वरूप स्वीकारण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी केले आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वोच्च संस्था क्रेडाईने येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. गोयल यांनी रिअल इस्टेट कंपन्यांना सांगितले, ‘मी तुम्हाला यावर गांभीर्याने विचार करण्याची विनंती करतो... आम्ही या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सात कोटी कामगार आणि महिलांसाठी ईएसआयसी आणि भविष्य निर्वाह निधी नोंदणी सुनिश्चित करू शकतो का? यावर विचार व्हावा.
जर उद्योगाने ईएसआयसी आणि पीएफ नोंदणीची हमी सुनिश्चित केली तर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम होतील. संभाव्य फायद्यांविषयी माहिती देताना ते म्हणाले, ‘यामुळे तुमच्या उद्योगाला पत आणि विश्वासार्हता लाभेल. लोक कौतुक करू लागतील की आम्ही सात कोटी लोकांना रोजगार देतो आणि येत्या काही वर्षांत ही संख्या वाढेल.’ असेही गोयल यांनी स्पष्ट केले.
चांगल्या कामाचे श्रेय मिळेल
उद्योगाला चांगल्या कामाचे श्रेय मिळेल, असे ते म्हणाले. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षेसाठी ईएसआयसी आणि पीएफ नोंदणी आणि पेन्शनची हमी देऊन 100 टक्के आरोग्य ‘कव्हरेज’ सुनिश्चित करण्यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. गोयल म्हणाले की, यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कौशल्य आणि दक्षता वाढेल, ज्यामुळे गुणवत्ता सुधारेल.