For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ईएसआय हॉस्पिटल स्थलांतरित हेणार खासगी हॉस्पिटलमध्ये

07:52 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
ईएसआय हॉस्पिटल स्थलांतरित हेणार खासगी हॉस्पिटलमध्ये
Advertisement

निविदा प्रक्रियेला सुरुवात : अशोकनगर येथील ईएसआयची इमारत जीर्ण

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलची इमारत मोडकळीस आल्याने लवकरच एका खासगी हॉस्पिटलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले जाणार आहे. यासाठीच्या तांत्रिक निविदा प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. महिनाभरात एखाद्या सुसज्ज खासगी हॉस्पिटलमध्ये ईएसआय हॉस्पिटल स्थलांतरित केले जाणार आहे. यामुळे रुग्णांना उपचार घेणेही सोयीचे होणार आहे.

Advertisement

ईएसआय हॉस्पिटलची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. बऱ्याच ठिकाणचे स्लॅब कोसळत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांत अनेक पर्याय चाचपण्यात आले. सुरुवातीला उद्यमबाग येथे हे हॉस्पिटल स्थलांतरित करण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला. परंतु इमारतीचे भाडे व इतर गोष्टी यामुळे हा प्रस्ताव बारगळला. यमनापूर येथे तात्पुरत्या स्वरूपात रेफरल हॉस्पिटल सुरू करण्याबाबतही जोरदार चर्चा झाली. परंतु अद्याप मुख्य इमारतीतच कामकाज सुरू असल्याचे दिसून येत आहे.

अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलच्या जागी 100 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल केले जाणार आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हे हॉस्पिटल कुठे हलवायचे? असा प्रश्न होता. एखाद्या चालू असलेल्या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभाग स्थापन करून हे हॉस्पिटल सुरू ठेवावे, असा विचार सुरू आहे. त्यादृष्टीने सोमवार दि. 5 पासून ईएसआय आयुक्त कार्यालयाकडून निविदा काढण्यात आल्या आहेत. पुढील महिन्यात हे हॉस्पिटल सुरू करण्याचा ईएसआयसीचा विचार आहे.

बेळगावमधील नामांकित हॉस्पिटलचा सहभाग

जिल्ह्यातील 3 लाख 40 हजार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना ईएसआयच्या सुविधा दिल्या जातात. त्यामुळे 50 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल खासगी हॉस्पिटलच्या जागेत सुरू ठेवले जाणार आहे. यासाठी बेळगावमधील सात ते आठ खासगी हॉस्पिटल इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात कमी हॉस्पिटलचे भाडे येणारी निविदा मंजूर केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या हॉस्पिटलमध्ये ईएसआय हॉस्पिटल स्थलांतरित होणार हे येत्या दहा ते पंधरा दिवसांत स्पष्ट होणार आहे.

ईएसआय हॉस्पिटलची इमारत जीर्ण

अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलची इमारत जीर्ण झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात खासगी हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. यासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या महिनाभरात हॉस्पिटल स्थलांतरित करून रुग्णांसाठी खुले करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- मंजुनाथ कळसण्णावर, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय हॉस्पिटल

► जिल्ह्यात 3 लाख 40 हजार ईएसआय लाभार्थी

► अशोकनगर येथे 1999 मध्ये बांधण्यात आली होती इमारत

► इमारत जीर्ण झाल्याने हॉस्पिटल स्थलांतराचा विचार

Advertisement
Tags :

.