ईशा देओल अखेर झाली विभक्त
विवाहाच्या 11 वर्षांनी नाते संपुष्टात
अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओलने अखेर पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेतला आहे. विवाहाच्या सुमारे 11 वर्षांनी दोघांनी परस्पर सहमतीद्वारे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही एक वक्तव्य जारी करत याची माहिती दिली आहे.
आम्ही परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील हा बदल आमच्या आणि आमच्या दोन्ही मुलांच्या हिताकरता आहे. आमच्या खासगीत्वाचा सन्मान केला जावा असे या वक्तव्यात नमूद आहे. भरत तख्तानी हा ईशाचा बालपणीचा मित्र होता.
ईशा देओलच्या वैवाहिक नात्यात समस्या निर्माण झाल्याचे वृत्त मागील काही काळापासून सातत्याने समोर येत होते. दोघांच्या घटस्फोटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. ईशा देओल आणि भरत यांच्या नात्यात दुरावा आल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडूनच सांगण्यात आले होते. ईशा देओलच्या एका सोशल मीडिया पोस्टवरून देखील यासंबंधीचे संकेत मिळाले होते.