Miraj Breaking : जेलच्या सुरक्षेचे कडे तोडणारा खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात!
जेलमधून पळून गेलेला खुनाचा आरोपी अजय भोसले जेरबंद
मिरज : सांगली मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेचे कडे तोडून परागंदा झालेला खून प्रकरणातील आरोपी अजय दावीद भोसले (वय 35 वर्षे, रा. संजय गांधी झोपडपट्टी, तासगाव वेस, मिरज) अखेर पाच दिवसानंतर जेरबंद करण्यात मिरज शहर पोलिसांना यश आले. संबंधित आरोपी हा 13 नोव्हेंबर रोजी कारागृहाच्या तटावरुन खंदकात उडी मारुन पळुन गेला होता. त्यानंतर तो उदगाव एसटी स्टँड परिसरात पत्नीला भेटण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद केले.
संशयित अजय भोसले हा मिरजेतील कुणाल वाली खून प्रकरणातील आरोपी आहे. त्याला सांगली मध्यवर्ती कारागृह ठेवण्यात आले होते. मात्र 13 नोव्हेंबर रोजी तो जेलमधून पळून गेला होता. त्यामुळे सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यासाठी विविध पोलीस पथक रवाना केली होती. मिरज शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखाही या आरोपीच्या शोधात होती.
. गुन्हे प्रकटीकरण पथक हे सदर आरोपीचा शोध घेत असताना पथकास अशी माहीती मिळाली की, सदर आरोपी हा उदगाव बस स्टैंड, जयसिंगपुर येथे आला आहे. त्यानुसार गुन्हेप्रकटीकरण अधिकारी सपोनि आण्णासाहेब गादेकर यांनी पोलीस शिपाई दिपक परीट यांना तात्काळ सदर ठिकाणी जाण्याच्या सुचना दिल्या. परीट हे तात्काळ सदर ठिकाणी जावुन निगराणी केली असता आरोपी अजय भोसले हा बस स्टँडवर मिळुन आला.
पोलीस आल्याचे दिसताच आरोपी अजय भोसले हा पळुन जाण्याच्या तयारीत असताना होता. परीट यांनी त्यास एकटयाने शिताफीने पकडले. तात्काळ जयसिंगपुर पोलीस ठाणे येथुन फोनवरुन मदत मागवीली व आरोपीस मिरज शहर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान आरोपी अजय भोसले हा जेलमधून पळाल्यानंतर त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी उदगाव एसटी स्टँडवर थांबल्याची माहिती समोर येत आहे. जेलमधून पळाला पत्नीला भेटला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला असा थरारक पट उलगडला आहे. मात्र त्याला पत्नी भेटायला आली होती की नाही, याला मात्र पोलिसांनी दुजोरा दिला नाही.