चुकवा चौऱ्याऐंशीचा फेरा
भगवंत म्हणाले, सर्वसामान्य माणसाने केलेली पुण्यकर्मे त्याला स्वर्गसुख मिळवून देतील परंतु त्याला ब्रह्मसुख मिळेलच असे नाही. म्हणून अर्जुना तू योगी हो. योगाभ्यास केलास तर तुला ह्याच जन्मी सर्व ईश्वरव्याप्त असल्याची प्रचिती येईल आणि तू स्वत: ब्रह्मस्वरूप असल्याचे लक्षात येईल. असे घडले की तुला कोणत्याही मार्गाने कुठेही जायची गरज नाही. तू मुळचा ब्रह्मस्वरूप आहेस आणि त्यात केव्हाही बदल होत नाही.
अक्षरब्रह्मयोग ह्या आठव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवंत असे निर्णायक मत देतात की, वेदाध्ययन करण्यामध्ये, यज्ञामध्ये, तपश्चर्येमध्ये अथवा दानामध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितले आहे त्या सर्व फलांहून अधिक फल जीव व ब्रह्म यांचे ऐक्य कसे होईल हे जाणून घेण्यात आहे. ते जाणून, वेदाध्ययन करणाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या स्वर्गसुखाच्या फळाला मागे टाकून योगी श्रेष्ठ अशा स्थानाला पोहोचतो.
यज्ञात दानात तपात तैसे । जे बोलिले अध्ययनात पुण्य? ते लंघितो सर्व चि जाणुनी हे । योगी चढे आद्य पदास थोर ।।28।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जरी वेदाच्या अध्ययनाने अथवा यज्ञाचे किंवा तपाचे अथवा दानाचे पुण्य मिळाले तरी ते नित्यशुद्ध परमात्म्याच्या तुलनेत खूप कमी असते. योगीश्वराला दोन्ही प्रकारची सुखे उपलब्ध असतात. त्यातील ब्रह्मसुखाचे पारडे नेहमीच जड ठरते. मग तो योगीश्वर त्या स्वर्गसुखाचा पायरीसारखा उपयोग करून परब्रह्माच्या पाटावर बसतो. अशाप्रकारे तो आद्यपदावर आरूढ होतो.
ह्या सगळ्या विवरणाचा निष्कर्ष असा निघतो की, ब्रह्मपदी विराजमान होण्यासाठी योगाभ्यास करावा लागतो. त्यासाठी अष्टांगयोगाच्या साधनेच्या माध्यमातून तावून सुलाखून निघावे लागते. ज्याचा योगाभ्यास पूर्ण होतो तो सूर्यमार्गाने पुढे जाऊन ब्रह्मपदी आरूढ होतो. ज्याचा योगाभ्यास अपूर्ण राहतो तो धुम्र मार्गाने चंद्रलोकापर्यंत जाऊन पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो आणि योगाभ्यास पूर्ण करण्याची त्याला आणखी एक संधी मिळते.जो मनुष्य सत्कार्ये करतो पण योगाभ्यास किंवा ईश्वराची भक्ती करत नाही त्याला त्याने साठवलेल्या पुण्याच्या जोरावर स्वर्गात प्रवेश मिळतो आणि त्याचा पुण्याचा साठा संपला की त्याचा पृथ्वीवर पुनर्जन्म होतो. त्याला योगाभ्यास किंवा ईश्वरभक्ती करत असताना आणखीन आणखीन सत्कार्ये करण्याची संधी मिळते. ह्यातूनच त्याला त्याच्या उद्धाराचा मार्ग सापडतो आणि तोही सूर्यमार्गाने पुढे जाऊन ब्रह्मपदी विराजमान होण्याची पात्रता संपादन करतो. जो योगाभ्यास करत नाही, भक्ती करत नाही, सत्कार्ये करत नाही, त्याउलट लोकांना त्रास देतो, लांड्यालबाड्या करतो त्याला मात्र त्याची शिक्षा म्हणून नीच योनीत जन्म मिळत जाऊन चौऱ्याऐंशी योनींच्या फेऱ्यातून फिरावे लागते आणि तो फेरा पूर्ण झाला की, त्याला पुन्हा मनुष्य योनीत जन्म मिळतो. मग त्याला वर सांगितलेल्या उपायांनी स्वत:चा उद्धार करून घेण्याची संधी प्राप्त होते.
अध्याय आठवा समाप्त