For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाची ओढाताण

06:30 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावसाची ओढाताण
Advertisement

यंदाचे वर्ष हे एल निनो वर्ष असल्याने या वर्षी सरासरीच्या 94 टक्के इतकाच पाऊस पडणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तविले होते. या पार्श्वभूमीवर जूनमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकसह संपूर्ण देशाला पावसाने मोठा ताण दिला. तर जुलैमध्ये भारतातील अनेक भागात समाधानकारक पावसाची नोंद झाली. अतिरिक्त पावसामुळे महत्त्वाची धरणे भरल्याने अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळाला. तथापि, काही भाग अजूनही पावसापासून वंचित राहिला आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश होतो. देशाच्या विविध भागातही कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. स्वाभाविकच पावसाचा हा प्रादेशिक असमतोल व ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अंदाजामुळे देशावर दुष्काळाचे ढग पसरलेले दिसतात. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाची तूट राहणार असल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. ऑगस्टमधील मागच्या 15 ते 20 दिवसांचा विचार करता हा संपूर्ण महिना तुटीकडेच जात असल्याचे अधोरेखित होते. सध्या प्रशांत महासागरात एल निनोची निर्मिती झाली असून, तो वेगाने वाढत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या टप्प्यात तो ‘अतितीव्र’ स्वरुपात पोहोचणार आहे. स्वाभाविकच पावसावर त्याचे गंभीर परिणाम संभवतात. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 85, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 80 टक्के पावसाचा अंदाज आहे. तर जून ते सप्टेंबर या एकूण हंगामात सरासरीच्या 85 टक्केच पाऊस अपेक्षित असून, त्यामध्ये 15 टक्के तूट राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा देशात 70 टक्के दुष्काळाची शक्यता असल्याचे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे. या वर्षी महाराष्ट्राच्या काही भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. आसाम, ओडिसा, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या काही भागात पूर आले. परंतु, हे एका भागातील चित्र झाले. अन्य भागांमध्ये एल निनोचा पावसावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. पुढच्या टप्प्यात पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल राहणार असल्याचा अंदाज असला, तरी त्याच्या तीव्रतेवर सध्या तरी भाष्य करणे अवघड आहे. हे पाहता यंदा मान्सून कमकुवत ठरण्याचीच अधिक शक्यता आहे. 1950 साली निर्माण झालेला एल निनो हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा होता. यावर्षीचा एल निनोही तापदायक असून, 2027 सालापर्यंत याचा प्रभाव राहणार असल्याचे सांगितले जाते. यामुळे वातावरणात 2 अंश सेल्सिअसने फरक पडण्याची शक्यता अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने व्यक्त केली आहे. स्वाभाविकच ग्लोबल वॉर्मिंगचा वणवा अधिक दाहक असू शकतो. हे पाहता चालू वर्ष अनेकार्थांनी कसोटीचे असेल. भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे. नैत्य मोसमी पावसावरच येथील शेती, मातीचे भरणपोषण होते. परंतु, यंदा पावसातील चढउतार व खंड पाहता शेतीपुढे अनेकविध समस्या उभ्या राहिल्याचे दिसते. आधीच साखर व कांदा संकटाने लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. साखरेचा भाव 60 ते 70 रुपयांवर, तर कांद्याचा दर 50 रुपयांवर पोहोचला आहे. पावसाचे गणित बिघडले, तर ही अवस्था आणखी बिकट होण्याचा धोका असेल. याशिवाय पावसाच्या अनियमिततेचा फटका डाळी व इतर पिकांनाही बसून, त्यातून महागाईच्या झळा तीव्र होऊ शकतात. हे लक्षात घेऊन पुढील नियोजन करणे क्रमप्राप्त ठरते. सध्या विविध धरणांमध्ये पुरेसे पाणी असले, तरी अवर्षणाची शक्यता ध्यानात घेऊन हा साठा जपून वापरावा लागेल. साधारणपणे पावसाचे पूर्वमोसमी, मोसमी व परतीचा पाऊस असे तीन टप्पे आहेत. यंदा पूर्वमोसमी पाऊस झालाच नाही. मोसमी पावसात आत्तापर्यंत अनियमितता राहिल्याचे दिसून येते. तर हवामानाचे अंदाज पाहता सप्टेंबरमध्ये प्रवास सुरू करणाऱ्या परतीच्या पावसाकडूनही मोठ्या आशा बाळगता येत नाहीत. ही ओढाताण सोसतानाच त्यात टिकून राहण्याकरिता सूत्रबद्ध धोरणे आखावी व अंमलात आणावी लागतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.