तिसऱ्या फेरीत एरिगेसी, हरिकृष्णचे विजय
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : डी गुकेश, दीप्तायन यांचे पहिले डाव अनिर्णीत
वृत्तसंस्था/ पणजी
येथे सुरू असलेल्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत उझ्बेकच्या शमसिद्दिन व्होखिडोव्हचा आक्रमक खेळ करीत पराभव केला तर वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशने जर्मनीच्या फ्रेडरिक स्वेनविरुद्धचा तिसऱ्या फेरीतील पहिला डाव अनिर्णीत राखला.
इरिगेसीव्यतिरिक्त ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णनेही बेल्जियमच्या युवा ग्रँडमास्टर डॅनियल दर्धावर चमकदार विजय मिळवित आघाडी घेतली. एरिगेसी व हरिकृष्ण दोघांनीही पांढऱ्या मोहरांनी खेळत विजय मिळविले असल्याने परतीच्या लढती अनिर्णीत राखणे त्यांना आगेकूच करण्यास पुरेशी ठरणार आहे. तिसऱ्या फेरीच्या अन्य एका लढतीत आर. प्रज्ञानंदने अर्मेनियाच्या रॉबर्ट होव्हानिसीयानविरुद्धचा पहिला डाव अनिर्णीत राखला तर विदित गुजराथीनेही सॅम शँखलँडविरुद्धचा पहिला डाव बरोबरीत सोडविला. एरिगेसी सलग तिसऱ्या फेरीत चमकदार फॉर्ममध्ये दिसून आला. पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना वजिरासमोरील प्याद्याने सुरुवात केल्यानंतर व्होखिडोव्हवर एकतर्फी विजय मिळविला.
अन्य नामांकित खेळाडूंत उझ्बेकच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला व्हेनेझुएलाच्या जोस मार्टिनेझ हरविले. जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरला अलीकडेच ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या भारताच्या व्ही. प्रणवने बरोबरीत रोखले तर भारताचा दीप्तायन घोष व अर्मेनियाचा गॅब्रियल सर्गिसियान यांची पहिली लढतही बरोबरीत सुटली. परतीच्या लढती शनिवारी खेळविल्या जातील.