शिवपुतळा उभारणी... शिवजयंतीचा सुवर्णयोग!
नौदल दिनाच्या निमित्ताने 2023 मध्ये राजकोट-मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा एक वर्षाच्या आतच कोसळला. या दुर्दैवी घटनेनंतर प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात निर्माण झालेली भळभळती जखम भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा राजकोट येथेच शिवपुतळ्याची उभारणी केली जात आहे. याची पायाभरणी शिवजयंती दिनीच 19 फेब्रुवारीला होत आहे. हा खरोखरच चांगला योग असून समस्त शिवप्रेमींच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. मात्र नव्याने शिवपुतळा उभारणी करताना कोणतेही राजकारण न आणता आणि पूर्वीच्या त्रुटींचा अभ्यास करून, त्या दूर करून अनंतकाळ दिमाखात उभा राहणारा शिवपुतळा उभारावा, हीच अपेक्षा शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
4 डिसेंबर 2023 रोजी नौसेना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोकणातील राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर पर्यटनाच्या निमित्ताने कोकणात येणारे शिवप्रेमी हे प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान असलेल्या छत्रपतींच्या राजकोट किल्ल्यावर त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी भेट देऊ लागले.
लाखोंच्या संख्येने पर्यटन व शिवप्रेमींनी काही महिन्यातच भेटी दिल्याची नोंद झाली. परंतु, दिमाखात उभा असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला. ही घटना घडताच प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयात धस्सऽऽ झाले. शिवप्रेमींनी अतिशय तीव्र भावना व्यक्त करीत या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले. कोसळलेला शिवपुतळा पाहण्यासाठी गेलेल्या नेत्यांमध्ये राडा होण्याचा लांच्छनास्पद प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा एकदा शिवपुतळा उभारु, असे सत्ताधारी नेत्यांनी जाहीर केले. परंतु, हे सर्व होत असताना शिवप्रेमींमध्ये मात्र दुर्घटनेची जखम भळभळत होती. ही जखम कशी भरली जाणार हा प्रश्न उभा होता.
या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या शिल्पकार व बांधकाम सल्लागारांवर गुन्हाही दाखल झाला. असं असलं तरी जी दुर्घटना घडली, त्याबाबत कुणालाही माफ करता येणार नाही, हे सत्य होते. त्यामुळे प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं जात होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची दखल घेत शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असे सांगत जाहीर माफी मागितली होती. त्यामुळे राजकोट येथे कोसळलेला शिव छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारला जावा आणि शिवप्रेमींची भळभळती जखम भरली जावी, अशीच भावना सर्वांच्या मनात होती.
शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने राजकोट येथे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी, 19 फेब्रुवारी रोजी शिवपुतळा उभारणीची पायाभरणी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होत आहे. शिवजयंती दिनीच पायाभरणी समारंभ होत असल्याने हा एक चांगला योगायोग आहेच. त्याचबरोबर तमाम शिवप्रेमींच्या दृष्टीने एक सुखद क्षण आहे, असे म्हणता येईल.
पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्याचा परिणाम पुतळ्यावर होऊ नये, यासाठी ऑस्ट्रेलियन कंपनीकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. अशाप्रकारची तपासणी प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिंधुदुर्ग जिह्यात उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्यासाठी करण्यात येत आहे. या तपासणीसाठी शिवपुतळ्याचे मॉडेल ऑस्टेलियात पाठविण्यात येणार आहे.
शिवपुतळा जमिनीपासून 93 फूट उंचीचा असणार आहे. चबुतरा 10 मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर 60 फूट उंचीचा शिवपुतळा आणि शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल 23 फूट लांबीची असणार आहे. पुतळ्यासाठी कांस्य धातूच्या आठ मिमी जाडीच्या पत्र्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. यासाठी वापरण्यात येणारे स्टील हे स्टेनलेस स्टील आहे. यासाठी 31 कोटी 75 लाख ऊपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रा. लि. गाझिपूर, उत्तरप्रदेश यांच्यामार्फत हा पुतळा उभारण्यात येत आहे. यापूर्वीचा शिवपुतळा हा जमिनीपासून 40 फूट उंचीचा होता.
यापूर्वी उभारण्यात आलेल्या शिवपुतळ्याच्याच दिशेने नवीन शिवपुतळा उभारण्यात येणार आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने शिवपुतळ्याचा दर्शनी भाग असणार आहे. युद्धभूमीतील योद्ध्याच्या आवेशात हा शिवपुतळा असणार आहे. छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल असणार आहे. राम सुतार यांनी बनविलेल्या शिवपुतळ्याला शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर राजकोट किल्ला येथे तो उभारण्यात येणार आहे. शिवपुतळ्याचे आयुर्मान 100 वर्षे असणार आहे. त्याची 10 वर्षे देखभाल दुऊस्ती राम सुतार आर्ट क्रिएशन यांच्याकडे असणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामाची स्वतंत्र गुणवत्ता चाचणी टीमकडून पाहणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारण्याचे काम केलेले नव्हते. मुंबईतील अरबी समुद्रातील शिवपुतळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उभारण्यासाठी देण्यात आला आहे. मात्र, त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. राजकोट किल्ला येथील शिवपुतळा उभारण्याचे काम पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकामच्या सावंतवाडी विभागाकडे सोपविण्यात आले आहे. मागील शिवपुतळा दुर्घटनेतील त्रुटींवर अभ्यास करून नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. यासाठी राजकोट किल्ला येथेच तपासणी कक्ष स्थापन केला असून सर्व बाजूंचा विचार करूनच सार्वजनिक बांधकाम विभाग पावले टाकत असल्याचेही बांधकाम अभियंत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.
राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी करीत असताना शिवजयंती दिनी ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. वातावरण निर्मितीच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याचबरोबर शिवजयंती दिनी शिवपुतळ्याची पायाभरणी करणे हा सुद्धा एक चांगला योग आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांनी पुतळा उभारणीमध्ये हलगर्जीपणा चालणार नाही, अशी सक्त ताकीद दिली असली, तरी पुतळा उभारताना यापूर्वीच्या चुका पुन्हा घडता नये. सर्व तांत्रिक बाबी तपासून घेणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनंत काळ दिमाखात उभा राहील आणि समस्त शिवप्रेमींसाठी प्रेरणा देत राहील, अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारला जावा, अशी अपेक्षा समस्त शिवप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.
संदीप गावडे