For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समत्व बुद्धी म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे योग्य आहे ते करणे

06:30 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
समत्व बुद्धी म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे योग्य आहे ते करणे
Advertisement

हणाले, ईश्वराने प्रत्येकाला कर्म नेमून दिलेले आहे त्यानुसार ते केल्यावर मिळणारे फळ भोगण्यासाठी पुनर्जन्म होणार हे नक्की. म्हणून असे म्हणतात की, कर्म माणसाला बंधनात अडकवू शकते तसे ते बंधनातून मुक्तही करू शकते. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी निरपेक्षपणे कर्म करण्याची सवय लावून घ्यावी. अर्थात कर्म केले की, फळ हे मिळणारच म्हणून ईश्वराने दिलेले कर्माचे फळ त्यालाच अर्पण करावे म्हणजे मनुष्य त्या फळाच्या बंधनातून मुक्त होतो. ईश्वर माणसाकडून त्याला हवे तसे आणि हवे तितकेच करून घेत असतो, त्यामुळे ते पूर्ण झाले तरी संतोष मानू नये किंवा अर्धवट राहिले तरी नाराज होऊ नये. बंधनातून मुक्त होणे म्हणजे काय ते पारतंत्र्यात असलेला माणूस बरोबर सांगू शकेल. जो कर्मबंधनाच्या तावडीत सापडतो तो पारतंत्र्यातच असतो. ह्या पारतंत्र्यातून सुटण्याची संधी भगवंतांनी माणसाला दिलेली आहे. एकदा ही संधी घ्यायची असे ठरले की, कर्म आणि फळ ह्या दोन्हीतही ममत्व किंवा आसक्ती न राहता पूर्ण, अपुर्ण किंवा चांगल्या, वाईट कर्माविषयी मनाचा समतोलपणा राखता येतो. हीच योगस्थिती होय. भगवंत ह्या योगस्थितीची प्रशंसा करताना पुढील श्लोकात म्हणतात, अर्जुना, समत्वबुद्धिच्या आधारे केलेल्या कर्माच्या तुलनेत फळाच्या इच्छेने केलेले सकाम कर्म कधीही निकृष्ट असते. त्यामुळे फळाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे दीन होत.

Advertisement

समत्व-बुद्धि ही थोर कर्म तिहूनि हीन चि । बुद्धीचा आसरा घे तू मागती फळा दीन ते ।।49 ।।

ह्या श्लोकात समत्वबुद्धी हा शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आधी समजावून घेऊ. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, समत्व बुद्धी म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे योग्य आहे ते करणे. श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला समत्व बुद्धीने कर्म करायला सांगितले आहे. समोरच्या माणसाच्या संदर्भात काय करणे योग्य होईल हे नितीशास्त्राच्या आधारे ठरवता येते. नितीशास्त्रातील तत्वे वापरून घेतलेले निर्णय कुणा एकाची बाजू न घेता घेतला गेलेला असल्याने तो योग्यच असतो. मात्र त्यासाठी बुद्धी सात्विक हवी. सात्विक बुद्धीने कुणासाठी काय करायला हवे, हे सहजी समजते. त्यानुसार जेव्हा बुद्धी निर्णय घेते तेव्हा तो निर्णय समत्वबुद्धीने घेतलेला असतो. अर्जुनाला तू युद्ध कर म्हणून भगवंत सल्ला देत आहेत तो नितीशास्त्राला धरून असल्याने समत्वबुद्धीने दिलेला आहे. स्वजनांच्या दुष्कृत्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्यामुळे युद्धात त्यांचा वध झाला तरी हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे मरण त्यांच्याच पापामुळे ओढवले असल्याने त्याचे पाप तुला लागणार नाही अशी ग्वाहीही भगवंत देतात. हे सर्व कथासूत्र पुढील श्लोकातून उलगडत जाणार आहेच त्याचे सुतोवाच भगवंतांनी ह्या श्लोकात केलेले आहे. मनुष्य करत असलेल्या भेदभावामुळे समत्वबुद्धीने निर्णय घेण्याचे धाडस त्याला होत नाही. त्यामुळे ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते त्याच्या हातून घडत नाही. ज्याला तो आपला समजतो त्याच्या मनासारखे व्हावे म्हणून चुकीचा निर्णय घेतला जातो. त्याउलट ज्याला तो परका समजतो त्याच्यासाठी जे करणे उचित आहे ते तो करत नाही. समोर अपराधी आला आणि तो अगदी नातेवाईक जरी असला तरी न्यायाधीशाने त्याला शिक्षा करणे ही समत्वबुद्धी होय, एखादा परका मनुष्य अडचणीत असेल तर त्याला योग्य ती मदत करणे ही समत्वबुद्धी होय.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :

.