For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समानता आणि कडवा धर्मवाद !

06:30 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
समानता आणि कडवा धर्मवाद
Advertisement

देशातील 13 राज्यांमधील 88 लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. पुढील टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. ज्या 88 मतदारसंघात मतदान होणार आहे. गेल्या म्हणजेच इ. स. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यातील 50 जागा भाजपने जिंकलेल्या होत्या. वास्तविक आज 89 जागांसाठी मतदान होणार होते मात्र त्यापैकी एका उमेदवाराचे मध्यप्रदेशात निधन झाल्याने निवडणूक स्थगित करावी लागली आहे. गेल्या निवडणुकीत या आज होणाऱ्या निवडणुकीतील मतदारसंघांपैकी 21 जागांवर काँग्रेसने यश प्राप्त केले होते तर भाजप वगळता एनडीए आघाडीने स्वतंत्रपणे 8 जागांवर यश मिळविले होते. आजच्या या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यात 1192 उमेदवार रिंगणात आहेत. पैकी केवळ 100 महिला आहेत. इतर सर्व पुरूष उमेदवार आहेत. आज होणार असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये सभापती ओम बिर्ला, केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर, काँग्रेसनेते राहुल गांधी, अभिनेत्री हेमामालिनी, रामायणात रामाची भूमिका बजावलेला अभिनेता अरूण गोविल, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, गजेंद्र सिंग शेखावत इत्यादींचा समावेश आहे. केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधी विरूद्ध भाजप अशी रंगतदार लढत होणार आहे तर थिरूअनंतपुरममध्ये केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांची लढत राहुल गांधींशी होत आहे व त्यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आज प्रत्यक्षात मतदान होणार आहे व त्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही कारणे दाखवा नोटीसा जारी केलेल्या आहेत. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका भाषणातून त्यांनी चक्क मुस्लिम समुदायाला अप्रत्यक्षरित्या टार्गेट केले. आयोगाकडे यासंदर्भात मोदी व राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या, त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली व देशात सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना त्यावेळी काही नियम पाळले नाहीत. जात, पात, धर्म यांचा उल्लेख झाला आणि त्यासंदर्भात मुसलमान नागरिकांवर विशिष्ट पद्धतीची टीका करण्यात आली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील अशाचप्रकारे जर निवेदन करीत राहिले तर या देशातील इतर नागरिकांनी कोणाला आपला आदर्श म्हणून उभे करायचे? हा प्रश्न उपस्थित होतो. या देशात सर्व नागरिकांना समान हक्क आहे. अल्पसंख्यांकांचे प्रमाण असल्यामुळे मुस्लिम आणि ख्रिश्चनांना अल्पसंख्यांकांचा दर्जा दिलेला आहे मात्र या अल्पसंख्यांकांचा वापर ऐन निवडणुकी दरम्यान करण्यात येतो. राजकारणासाठी अशा पद्धतीने वापर केल्याने देशातील वातावरण गढूळ होते. लोकशाहीमध्ये सर्वांनाच समान हक्क व अधिकार आहे. काहीजणांना अति अधिकार प्राप्त होतात व त्या अधिकारांचा मंडळी गैरफायदा उचलतात. राजकारण आणि समाजकारण हे दोन खमंग विषय आहेत. तरीदेखील सार्वजनिक क्षेत्रात उतरणाऱ्यांनी भारतीय घटनेच्या नियमांचा जरूर अभ्यास करावा. या देशातील प्रत्येक नागरिकाला देशात कोणत्याही राज्यात जाण्याची मुभा आहे. केवळ अपवादात्मक म्हणून काश्मीर आणि काही पूर्वोत्तर राज्यांमध्ये बंदी होती ती आता शिथिल करण्यात आली. जातीधर्माच्या नावाखाली देशातील प्रत्येक राजकीय पक्षाची व त्यांच्या नेत्यांची पाळेमुळे खोलवर रूजलेली आहेत. एक राजकीय नेता अल्पसंख्यांकांची बाजू घेतो तर दुसरा नेता अल्पसंख्यांकांना कुरवाळण्याचे बंद करा, आता तुष्टीकरण बंद करा अशी सूचना करतो खरा परंतु या देशात उमेदवारीदेखील देताना त्याची जात, पात, धर्म पाहिला जातो व ज्या भागात उमेदवारी दिली जाते त्या भागातील मतदार नेमके कोण आहेत? सदरच्या मतदारसंघात कोणत्या जातीचे किती मतदार आहेत हे पाहून त्या त्या जाती, धर्माच्या उमेदवाराला रिंगणात उतरविले जाते. असे हे चित्र सर्रास सर्वत्र असले तरीदेखील एखाद्या जातीधर्मावर सार्वजनिकरित्या त्या त्या पक्षातील नेत्यांनी वा उमेदवारांनी टीका करणे हे बरोबर नाही. टीका करून थांबत नाही तर त्यांना आव्हान दिले जाते. परिणामी त्यातील काही घटक हे विरोधी पक्षातील मंडळींकडे जातात व विरोधी पक्षाचे नेते प्रकरण चिथावून घालतात. संपूर्ण देशात निवडणुकीच्या निमित्ताने त्यामागे होत असलेले प्रकार हे अत्यंत हिडीस आहेत. आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे व त्याच्या पूर्वदिनी पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक आयोग गंभीर दखल घेऊन पंतप्रधानांना 6 मेपर्यंत लेखी निवेदन सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. राहुल गांधी यांनादेखील अशाच प्रकारची नोटीस जारी होतेय. सहसा पंतप्रधानपदी पोहोचलेली व्यक्ती एवढी आक्रमक होत नसते जेवढे मोदी होतात. ऐन दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्व दिनी या नोटीसा जारी केल्याने साहजिकच देशात खळबळही माजली असणार. निवडणुकी दरम्यान सर्व राजकीय नेते हे बेफामपणे वागतात आणि वाट्टेल ती निवेदने करतात. निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणे हे लोकशाहीला घातकच होय. अलीकडे या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्यांचे भाजपवर बेछूट आरोप व प्रत्युत्तरादाखल भाजप नेत्यांनी त्याची पाळेमुळे उखडताना कोणताही मुलाहिजा राखला नाही. देश याकडे करमणूक म्हणून पहात असेल परंतु आपण राजकारणाचा दर्जाच कमी करतोय हे सर्वजण विसरून जातात. आपण नेमक्या कोणत्या पदावर आहे हेदेखील राजकीय नेते विसरतात. मात्र एकदा धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखावाटे निघालेला शब्द परत मागे घेता येत नाही.राजकीय पक्षांनी सर्वांना समान संधी व घटनेसमोर सर्वजण समान आहेत हे लक्षात ठेवून केवळ एका विशिष्ट धर्माचे प्रेम ऊतू जाईल एवढ्या पद्धतीने तुष्टीकरणही करू नये. वास्तविक आपल्याकडे धार्मिक तेढ निर्माण करणारे अनेक अल्पसंख्यांक आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. या देशात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी राजकीय आणि धार्मिक ध्रुवीकरण होते. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी राजकीय पिलावळही या देशात कमी नाही. दोन जाती, धर्मियांमध्ये पेटवून टाकणे व त्यातून संघर्ष निर्माण करणारे गोंधळाचे वातावरण तयार करण्याचे काम करणारी मंडळी या देशात कमी नाही. हे करीत असताना राजकीय मंडळी तापलेल्या राजकीय तव्यावर  पोळी भाजून घेतात. देशातील 12 राज्यांमध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका पहिल्या टप्प्यातील निवडणुकीप्रमाणेच अत्यंत शांततेत होतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. निवडणूक आयोगाने थोड्या उशिरा का होईना परंतु देशातील दोन्ही दिग्गज नेत्यांना नोटीसा पाठविल्या. आता ही मंडळी नेमकी काय करतील! त्यांची धार्मिक समानतेवरची भाषणे ऐकल्यानंतर त्यांची अलीकडेच आलेली निवेदने आणि यापूर्वी समानतेसंदर्भात केलेली निवेदने पाहता त्यांची खरी भूमिका नेमकी कोणती? हा प्रश्न उपस्थित होतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.