भाजपात स्त्री-पुरुषांना समान स्थान
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : महिला भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल
पणजी : भारतीय जनता पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष आहे. पक्षात कुणीही उच्च-निच्च नाही. त्यामुळेच महिलांना समान संधी मिळत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज गोव्यासारख्या राज्यात महिलाही पक्षाची मंडळ अध्यक्षाची निवड हे होय. महिला आणि पुरुष असा भेदभाव न करता पक्षाचे काम सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेद्वारे महिलांना स्वाभिमानी जीवन जगता येत आहे. त्यामुळेच आपले घरचे उत्पन्न घरात तयार करून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे भाजपने खूप मोठे काम केले आहे. याचे सर्व श्रेय भाजपच्या महिला मंडळातील पदाधिकारी आणि सदस्यांना जाते, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महिलांविषयी गौरवोद्गार काढले.
भारतीय जनता पक्षातर्फे महिला दिनाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून भाजप महिला गटातील अध्यक्ष, सदस्य तसेच मतदारसंघातील महिला अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सावंत यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, भाजप महिला मंडळ अध्यक्षा भारती बांदोडकर व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने महिलांना व्यवसाय व उद्योगांसाठी अनेक योजना तयार केलेल्या आहेत. या योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी गोव्यातील भाजप सरकारने कसर सोडलेली नाही. महिला हीच भाजपची खरी ताकद आहे. त्यामुळेच भाजपात कोणताच भेदभाव न करता आर्थिक उन्नतीबरोबरच महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे याव्यात, यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेताना तळागाळातील सर्व महिलांपर्यंत ह्या योजना पोहचविण्यासाठी भाजप मंडळा गटाने कार्यरत रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, भाजप सरकारच्या काळात विविध योजना केल्या. त्यामध्ये महिलांनाही स्थान देण्यात आले. मुद्रा लोन, ई-रिक्षा (पिंक) या योजना राबविताना महिला केंद्रस्थानी राहतील याचा विचार करण्यात आला. स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून महिलांना स्थीरस्थावर करण्यात पक्षाने कसूर सोडली नाही. त्यामुळेच आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. केंद्रातील मंत्रिमंडळात भाजपाने महिलांनाही संधी दिलेली आहे. त्याचबरोबरच देशाची राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांना पुढे काढून भाजपने महिलांना समान संधी पक्षात असल्याचे दाखवून दिले आहे. हल्लीच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर रेखा गुप्ता महिला मुख्यमंत्री बनवून भाजपने महिलांच्या हाती नेतृत्व देण्यातही हात आखडता घेतला नाही, असेही दामू नाईक म्हणाले. राज्यसभा खासदार तानावडे यांनीही भाजपच्या महिला गटाचे कौतुक करताना भाजपच्या संघटन कार्यात महिलांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. महिला अध्यक्षा भारती बांदोडकर यांनी स्वागतपर भाषणात भाजपच्या महिला गटाचे कार्य आणि जबाबदारी यावर प्रकाश टाकला.
53 महिलांचा भाजपतर्फे सन्मान
भाजपच्या महिला मंडळातील 53 महिलांचा मुख्यमंत्री सावंत, दामू नाईक, तानावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये 40 मतदारसंघातील महिला अध्यक्षा, उत्तर गोवा व दक्षिण गोवा मंडळ अध्यक्षा तसेच सदस्या यांचा समावेश होता. भाजपच्या माजी महिला अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांचा निवडणूक काळातील उत्तम कामगिरीबद्दल दिल्लीत मिळालेल्या पुरस्काराप्रित्यर्थ आज विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय नेहा नाईक यांचाही गौरव करण्यात आला.