एपस्टिनचा दंशकाल आणि उपसर्ग
जगभरात गाजत असलेले एपस्टिन फाईल्स प्रकरण अनेक देशातील महनीय व्यक्तींच्या नाडीला हात घालणारे ठरले आहे. अती श्रीमंत, उद्योजक, राजकारणी, कलावंत, बडे लेखक, शास्त्रज्ञ ही मंडळी एपस्टिन नामक विकृत व पाताळयंत्री गुन्हेगाराच्या संपर्क व संबंधात कशा प्रकारे होती हे फाईल्समधील प्रत्यक्ष तपशील स्पष्ट करतो. प्रगत भांडवलशाहीत अमाप संपत्तीतून निर्माण होणाऱ्या अतिरेकी लालसा, नीतीमत्तेचा ऱ्हास आणि विकृतींचा विकास, त्याला बळी जाणारे अभावग्रस्त आणि या अभद्र वर्तुळातून उदयास येणारे उच्चस्तरीय हितसंबंध यांचे विराट तितकेच विदारक दर्शन एपस्टिन फाईल्समधून घडते.
संयुक्त राष्ट्र संघाच्या विशेषतज्ञांनी त्यात महिला, मुलींचे पद्धतशीर आणि मोठ्या प्रमाणात लैंगीक शोषण, यौवन तस्करी व फसवणुकीचे त्रासदायक आणि विश्वासार्ह पुरावे आहेत असे मत व्यक्त केले आहे. हे गुन्हे वर्चस्ववादी मनोवृत्ती, वंशवाद, भ्रष्टाचार आणि टोकाचा महिला द्वेष यावर आधारीत असून त्यात जगभरातील महिला व मुलींचे व्यापारी व अमानवीकरण सामील आहे. या वासनाकांडात गुंतलेल्या व्यक्तींचे राजीनामे गुन्हेगारी जबाबदारीसाठी पुरेसे नाहीत तर त्यांच्यावर निर्णायक कारवाई अत्यावश्यक आहे, असेही विशेषतज्ञांनी सुचवले आहे.
जेफ्री एपस्टिन अन् त्याच्या कारवाया
जेफ्री एडवर्ड एपस्टिन 1953 साली न्यूयॉर्क शहरात ज्यू कुटुंबात जन्मला. त्याने महाविद्यालयात गणित विषय घेतला पण त्याला पदवी घेता आली नाही. पुढे पदवी आणि शैक्षणिक पात्रता नसतानाही मॅनहटनमधील डाल्टन स्कूलमध्ये तो गणित शिकवू लागला. त्यांच्या लैंगिक दुर्वर्तनाची मुहूर्तमेढ याच शाळेत रोवली गेली. शाळेतील अल्पवयीन मुलींशी छेडछाड व गैरवर्तनाचे दाखले त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी दिले आहेत. 1976 साली खराब कामगिरीचा शेरा मारून त्याची हकालपट्टी झाली. मात्र शिक्षक म्हणून काम करताना शाळेच्या पालक-शिक्षक परिषदेत त्याने वॉल स्ट्रिटच्या एका कार्यकारी अधिकाऱ्यास आपल्या गणिती ज्ञानाने प्रभावित केले होते. त्या आधारे एपस्टिन ‘बेअर स्टर्न्स’ या व्यापारी आस्थापनात निम्नस्तरीय कनिष्ठ सहाय्यक म्हणून कामास लागला. 1982 साली त्याने स्वत:ची ‘जे एपस्टिन अँड कंपनी’ स्थापन केली. गुंतवणूक व नफा क्षेत्रातील त्याच्या कंपनीने एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किंमतीच्या ग्राहक मालमत्तेचे व्यवस्थापन करून लगेचच यश मिळवले. यानंतर तो जसा धनवान बनत गेला तशी त्याने मुक्तहस्ते पैशांची उधळण सुरू केली. अर्थात, ती अविचारी नसून त्यातून अधिक पैसा आणि अराजकीय सत्ता व दबदबा प्रस्थापित करण्याचा त्याचा विचार होता. फ्लोरिडातील आलिशान हवेली, मेक्सिकोतील शेती,
न्यूयॉर्कमधील भव्य निवासावर त्याने अफाट पैसे खर्च केले. तेथे राजकारणी, वलयांकित व्यक्ती, कलावंत यांच्यासाठी मेजवान्या आयोजित करून त्यांना खुश करणे आणि आपले हितसंबंधांचे जाळे विस्तृत करणे हा त्याचा उपक्रम होता. 2002 मध्ये ट्रम्प यांनी न्यूयॉर्क मासिकाशी संवाद साधताना म्हटले ‘एपस्टिन सोबत राहणे खूप गमतीचे आहे. त्याला माझ्याप्रमाणेच सुंदर स्त्रिया प्रिय आहेत. त्यापैकी बऱ्याच तरूण आहेत.’ ट्रम्प यांच्या अशा प्रकटीकरणावरून एपस्टिनच्या हितसंबंधांचा मूलाधार कोणता हे पुरेसे स्पष्ट होते. याचवर्षी एपस्टिनने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्ंिलटन व अभिनेते केविन स्पेसी आणि ख्रिस टकर यांना खाजगी विमानाने आफ्रिकेत नेले. 2003 मध्ये एक बडा निर्माता आणि लैंगीक गुन्हेगार हार्वे वाईनस्टाईन यांच्यासह न्यूयॉर्क मासिकाचे हक्क विकत घेण्याचा अयशस्वी प्रयत्न एपस्टिनने केला. त्याचवर्षी ख्यातनाम हार्वर्ड विद्यापिठास 30 दशलक्ष डॉलर्सची भरीव देणगी देऊन उपकृत केले. दरम्यान अमेरिकेच्या जवळची लिटल सेंट जेम्स आयलंड व ग्रेट सेंट जेम्स आयलंड ही बेटे एपस्टिनने खरेदी केली. ‘एपस्टिनचे राज्य’ असलेली ही बेटे त्याच्या लैंगिक स्वैराचाराचे, शोषणाचे व गुन्ह्यांचे केंद्र बनली. या साऱ्या कृष्णकृत्यात त्याची प्रेयसी धिसलेन मॅक्सवेलही सामील होती. तिच्या सहभागाने मुली, महिलांना फसवून लैंगिक अनैतिकतेकडे वळवण्याचे एपस्टिनचे काम खुपच सोपे झाले. भरघोस पगार, नामी संधी, उच्च शिक्षणास मदत, मॉडेलिंगमध्ये कारकिर्द, अशी आमिषे दाखवून स्त्राr वर्गात विश्वास निर्माण करणे आणि अलगद लैंगिक कृत्यात अडकवून त्याचा मोठा मोबदला देणे, विरोध झाल्यास संपर्कातील उच्चस्तरीय व्यक्तिंकडून दबाव आणणे ही दोघांची कार्यप्रणाली होती. धनाढ्या, महनिय असामींना त्यांच्या गरजांनुसार मुली पुरवणे आणि त्याच व्यक्तींचा धाक दाखवून वाच्यता रोखणे हे तंत्र एपस्टिनने वापरले. दुर्दैवाने त्याचा हा व्यवसाय आधुनिक भांडवलशाही जगात एवढा भरभराटीस आला की, मुली व महिला हेरून त्यांना अडकवण्यासाठी प्रतिष्ठित दलालांचे जाळेच विविध देशात त्याने पसरवले. इतकेच नव्हे, तर फसलेल्या मुली, महिलांना एका देशातून दुसऱ्या देशात पाठवण्यासाठी त्याने नितीमत्ता खुंटीवर टांगलेल्या वकिलांचा एक चमू तयार केला. जो सावजाला व्हिसा, पासपोर्ट, कामाचा परवाना उपलब्ध करून देण्यासाठी कायदेशीर पुर्तता करण्यासाठी अहोरात्र झटत होता. एपस्टिन समुहाने अशा मुली व महिलांना लक्ष्य केले ज्या अजाण किंवा जिद्दी, महत्वाकांक्षी व संधीच्या शोधात होत्या. पालक व कुटुंबियांना त्यांची काळजी वाटत असे.
तपास, सजा व आत्महत्या
2005 साली एपस्टिनने आपल्या 14 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्या मुलीच्या सावत्र आईने फ्लोरिडा पोलीसांपुढे केला. ‘एका महिलेने आपल्या मुलीला मालिश करण्याचे काम सांगून 300 डॉलर्स दिले व पाम बीचमधील एपस्टिनच्या हवेलीत नेले. तेथे खुद्द एपस्टिनने मुलीचा विनयभंग केला’ असे या आरोपाचे स्वरूप होते. महत्त्वाचे हे की, हा आरोप होण्याआधी एपस्टिनने या पोलीस विभागाला 90 हजार डॉलर्सची देणगी दिली होती. त्यामुळे तपासकार्यावर संशय व्यक्त झाल्याने तपाससुत्रे एफबीआयकडे गेली. पुढील आरोप समोर येऊ लागले आणि फौजदारी खटला सुरू होईपर्यंत शोषित मुलींची संख्या 40 पर्यंत गेली. एपस्टिन खटले व तुरूंगवासाच्या जाळ्यात अडकला. 2018 मध्ये मियामी हेराल्डमधील ज्युली ब्राऊन या धाडसी पत्रकार महिलेने एपस्टिन किंवा त्यांच्या ‘मित्रांकडून’ लैंगिक शोषण झालेल्या 80 स्त्रियांची ओळख पटवली व पुन्हा तपासास गती आली. लैंगिक तस्करी आणि कट रचल्याच्या आरोपावरून एपस्टिनला जामीन नाकारून
मॅनहॅटन तुरूंगात ठेवण्यात आले. 10 ऑगस्ट 2019 मध्ये तो कोठडीत मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूस आत्महत्या घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या कारनाम्याचा समग्र वृत्तांत जो तपासात उघड होत गेला होता तो लोकांसमोर आणण्यासाठीचा दबाव वाढू लागला. त्यातूनच ट्रम्प सरकारने ‘एपस्टिन फाईल्स’ उघडकीस आणल्या. हे सारे घडेपर्यंत एपस्टिनच्या अत्याचारातून वाचलेल्या हजारहून अधिक मुली व तरूणींनी फाईल्स जाहीर करण्यासाठी सातत्याने केलेले आवाहनही महत्वपूर्ण ठरले.
एपस्टिन फाईल्समधील नामांकित
फाईल्समधून जी माहिती आतापर्यंत बाहेर आली आहे. त्यात वासनाकांड घडवणाऱ्या एपस्टिनशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आलेल्या अनेक मान्यवरांची नावेही उघड झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष क्लिंटन, ब्रिटनचे माजी राजपुत्र अँड्य्रू माऊंटबॅटन, उद्योजक बिल गेटस्, एलॉन मस्क, जगप्रसिद्ध साहित्यिक नोम चॉस्की, चित्रपट निर्माते वुडी अॅलन, भारतीय उद्योजक अनिल अंबानी, पेंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी अशी काही आणि इतर बरीच नावे आहेत. अनेक देशात या संदर्भात आरोप-प्रत्यारोप, खुलासे, चौकशा यांचे सत्र सुरू आहे. विशेषत: युरोपियन देशांनी एपस्टिन प्रकरण गांभिर्याने घेत अनेक मान्यवरांना गजाआड पाठवले. एकंदरीत आधुनिक घाशिराम कोतवाल एपस्टिनच्या गळास लागलेले सारे बडे मासे फाईल्समुळे उघड्यावर येऊन पद, प्रतिष्ठा, अब्रु वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र जगभरात आहे. मुद्दा अशावेळी ‘एपस्टिन दर्शन’ सत्य सांगते की असत्य हा नसून, या लांछनास्पद दर्शनात आपला उल्लेख यावाच का? हा आहे. एकीकडे स्त्राr-पुरूष समानता, महिला सबलीकरण याचा जयघोष करताना महिला वर्गाचे अनिर्बंध शोषण करणारा एखादा ‘एपस्टिन’ त्याच समाजात इतका फोफावतो कसा? त्याची पार्श्वभूमी माहित असूनही त्याच्याशी हितसंबंध स्थापित होतात कसे? याचा विचार करण्याची वेळ आज जगातील प्रत्येकावर आली आहे.
-अनिल आजगांवकर