ईपीएफओ 3.0 डिजिटल प्लॅटफॉर्म लवकरच होणार लाँच
कोट्यावधी पीएफ लाभार्थ्यांना फायदा होणार : केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या कोट्यावधी सदस्यांसाठी नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. ईपीएफओ 3.0 चा एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लवकरच लाँच होणार आहे. याद्वारे, एटीएम ते पीएफचे पैसे काढण्याच्या डिजिटल सुधारणा यासारखे अनेक बँकिंग कार्य सोपे आणि पारदर्शक केले जातील. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की ईपीएफओ 3.09 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल. ज्यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतील. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता पीएफ खात्याचे पैसे एटीएममधून देखील काढता येतील.
ईपीएफओ 3.0 अंतर्गत 5 मोठे बदल
- एटीएम आणि युपीआयमधून पीएफ पैसे काढणे- ईपीएफओ 3.0 मधील सर्वात मोठा बदल म्हणजे ते एटीएम आणि युपीआयद्वारे पीएफ पैसे काढू शकेल.
- सुलभ पैसे काढणे- ईपीएफओ 3.0 लागू झाल्यानंतर, पीएफ काढण्याची प्रक्रिया खूपच सोपी आणि जलद होईल. कारण मॅन्युअल कामाची आवश्यकता देखील कमी होईल. दाव्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित होईल. सध्या, ऑटो-क्लेम सेटलमेंट मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
- डिजिटल प्रोफाइल अपडेट आणि सुधारणा- ईपीएफओ 3.0 सह, सदस्य त्यांच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (युएएन) द्वारे नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, पालकांचे नाव, वैवाहिक स्थिती आणि नोकरी सुरू होण्याची तारीख यासारखे तपशील ऑनलाइन अपडेट करू शकतील. म्हणजेच, सदस्यांना इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही.
- सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस)- ही सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टम ईपीएफओने आधीच लागू केली आहे. ज्यामध्ये पेन्शनधारकांना अशी सुविधा देण्यात आली आहे की ते देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढू शकतात.
- ईपीएफओ 3.0 अंतर्गत तक्रारींचे निवारण देखील जलद केले जाईल. कर्मचारी राज्य विमा महामंडळ देखील त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी काम करत आहे.
ईपीएफओ 3.0 चे इतर फायदे
- दाव्याच्या प्रक्रियेचा वेळ कमी केला जाऊ शकतो.
- चेकबुक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता पूर्ण होणार.
- नोकरी बदलण्यासाठी पीएफ हस्तांतरणासाठी नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता दूर करण्यात आली आहे. ईपीएफओ 3.0 चे उद्दिष्ट हे प्लॅटफॉर्म सदस्यांसाठी अधिक सुरक्षित, सोपे आणि अधिक पारदर्शक बनवणे आहे.
- हे केवळ कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सुविधा वाढवेल असे नाही तर डिजिटल इंडियाचे स्वप्न देखील बळकट करेल.