पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून गोव्यात पर्यावरण क्रांती!
मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाची घोषणा : गोव्यात 90 दिवसांची महावृक्षलागवड मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित देशाचे बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मोदींच्या संकल्पनेतून गोव्यात पर्यावरण क्रांती होणार असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाची घोषणा करताना गोव्यात 90 दिवसांची महावृक्ष लागवड मोहिमेची घोषणा केली. ‘एक पेड माँ के नाम‘ या देशव्यापी उपक्रमातून प्रेरणा घेऊन गोव्यात 90 दिवसांच्या ‘ग्रीन गोवा, क्लीन गोवा’ (हरित गोवा, स्वच्छ गोवा) मोहीम यशस्वी करण्यावर मुख्यमंत्र्यांनी जोर दिला आहे.
त.भा. प्रतिनिधी
पणजी : या महत्त्वपूर्ण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी काल शनिवारी स्वयंपूर्ण मित्र, नोडल अधिकारी, पंचायत प्रतिनिधी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी आभासी (व्हर्च्युअल) माध्यमाद्वारे संवाद साधून कामाचा आढावा घेतला आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ही विशेष मोहीम 5 जून (जागतिक पर्यावरण दिन) पासून सुरू झाली असून ती आगामी 5 सप्टेंबरपर्यंत अव्याहतपणे सुरू राहणार आहे. या 90 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण गोवा राज्यात सुमारे 10 लाख वृक्षलागवड करण्याचे एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे.
या मोहिमेचा एक मुख्य भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘ग्रीन एनएच 66’ या विशेष प्रकल्पावर विशेष प्रकाश टाकला. या अंतर्गत, गोव्याच्या उत्तरेकडील पत्रादेवी ते दक्षिणेकडील काणकोण या संपूर्ण महामार्गाच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर नियोजनबद्ध वृक्षलागवड केली जाईल. या राष्ट्रीय महामार्गाचे एका नयनरम्य आणि प्रदूषणमुक्त ‘हरित कॉरिडॉर‘मध्ये रूपांतर करण्याचा सरकारचा मानस आहे.
सामूहिक जबाबदारी अन् मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, गोव्याला अधिक सुंदर, हरित आणि स्वच्छ बनवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती एका सामूहिक लोकचळवळीच्या रूपात पुढे जाणे गरजेचे आहे. तळागाळातील लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, गोव्यातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेबाबतची आपली जागरूकता अधिक बळकट करावी आणि स्वच्छ, सुंदर व पर्यावरणाविषयी पूर्णपणे जागरूक असणाऱ्या गोव्याच्या संकल्पनेला प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण पाठिंबा द्यावा, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.
महामार्गालगत कचरा टाकणे, अतिक्रमणे टाळा
महामार्गालगत स्टॉल्स लावणे म्हणजे अतिक्रमण असून त्यामुळे अपघात होऊ शकतात व वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी महामार्गालगत स्टॉल्स लावू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. राज्यभरातील रस्ते अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांमध्ये शिस्त आणि त्यांच्या सहकार्याची गरज आहे. महामार्ग आणि अन्य रस्ते अडथळ्यांपासून
मुक्त ठेवल्यास रस्ता सुरक्षा
सुधारेल तसेच जीवितहानी टाळण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी, अशाप्रकारे महामार्गालगत अतिक्रमणे टाळण्याबरोबरच रस्त्याशेजारी कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे व स्वच्छता ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. हे पोलीस महामार्ग आणि रस्त्यांच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर कडक नजर ठेवतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.