रिफायनरीऐवजी पर्यावरणपूरक प्रकल्प आणणार !
04:50 PM Nov 10, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
किरण सामंत यांची पत्रकार परिषदेत ग्वाही
वार्ताहर राजापूर
तालुक्यातील बारसू, सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असल्याने रिफायनरीऐवजी पर्यावरणपूरक व जनतेला मान्य असलेले तसेच मोठी गुंतवणूक असलेले दोनप्रकल्प राजापुरात आणण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याने त्यात राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील आपल्यासारख्या एका आमदाराचा समावेश असावा, यासाठी येथील स्थानिक जनतेनेच ही निवडणूक हाती घेऊन आपले मनोबल वाढविले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात सतत भावनेचे राजकारण झाल्याने अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. येथील ओस पडत चाललेली गावे-बाजारपेठांच्या प्रश्नासह स्थानिक जनतेच्या शिक्षण व्यवस्था, आरोग्यसेवा आणि रस्ते ,पाण्यासह सर्वच पायाभूत सुविधांची असलेली दुरवस्था पाहून महायुती शासनाने शेकडो कोटींचा निधी दिला आहे. दुर्दैव म्हणजे स्थानिक आमदारांनी एकाच मतदारसंघात किंबहुना आपल्याच मतदारसंघात अधिक निधी दिला म्हणूनही भावनिक तक्रार आहे. त्यामुळे त्यांची निष्ठा मतदारसंघाशी आहे की फक्त राजकीय आहे, असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला आहे.
ओणीत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर
राजापूर विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांची वानवा आहेच. शिवाय आरोग्यसेवेबाबत येथील जनता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबईवर अवलंबून आहे. महाविकास आघाडी शासनाच्या काळात राज्यात विभागात एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असे धोरण पुढे करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापुरातील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रस्ताव लालफितीत गुंडाळून ठेवला होता. मात्र, विद्यमान महायुती शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी ओणी येथे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय खास बाब म्हणून मंजूर केले आहे. यासाठी आपला सततचा पाठपुरावा सुरू होता, असे सामंत यांनी सांगितले.
दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा अभाव
स्थानिक पातळीवर चांगले शिक्षण नाही आणि रोजगारही नसल्याने तालुका ओस पडत चालला आहे. ग्रामीण भागातील घरात केवळ वृद्ध व्यक्तींचा वावर आहे. मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे शहरासह ग्रामीण बाजारपेठांतही मोठा शुकशुकाट आहे. ही दयनीय अवस्था का आली, याचा विचार करताना दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा अभाव याशिवाय दुसरे कारण शोधून सापडत नाही. आपल्या आयुष्यातील 15 वर्षांचा काळ अशा पद्धतीने गेला असताना आणखी 5 वर्षे आपण जर हेच भोगत राहिलो तर येथील नव्या पिढीच्या आयुष्याचे, भवितव्याचे काय, असा प्रश्न निर्माण झाल्याचे सामंत म्हणाले.
Advertisement
Advertisement
Next Article