इराणी खणीत 56 हजार 372 गणेश मुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
गतवर्षीच्या तुलनेत उत्स्फूर्त प्रतिसाद; 24 तास राबली मनपा यंत्रण, 150 टन निर्माल्य दान
कोल्हापूर प्रतिनिधी
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास यंदाही करवीर वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदा इराणी खणीमध्ये तब्बल 56 हजार 372 गणेश मुर्तींचे विसर्जन झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्यावरणपूरक विसर्जनाकडे नागरीकांचा कल वाढलेला दिसला. यंदा 150 टन निर्माल्य जमा झाले असून, याद्वारे खत निर्मीती करण्यात येणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी नागरीकांनी पर्यावरणपूरक गणेशमुर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत 207 विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवार पासूनच शहराच्या विविध ठिकाणी हे विसर्जन कुंड उभारण्यात आले होते. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत नागरकांनी महापालिकेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या पर्यावरण पूरक कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये व इराणी खणीमध्ये गणेश मुर्ती विसर्जित केल्या. गांधी मैदान विभागीय कार्यालय अंतर्गत 11 हजार 63, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत 8145, राजारामपुरी विभागीय कार्यालय अंतर्गत 7 हजार 854, ताराराणी विभागीय कार्यालया अंतर्गत 7332 अशा 15 हजार 911 गणेश मुर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात करुन महापालिकेस सहकार्य केले आहे. त्याचप्रमाणे शहरातून व ग्रामीण भागातून आलेल्या 21 हजार 978 मुर्ती नागरीकांनी थेट इराणी खण येथे विसर्जीत केल्या. घरगुती गौरी गणपती विसर्जनास शहरातील नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देऊन 56 हजार 372 मुर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, नेहा आकोडे, कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता रमेश कांबळे, महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, विद्युत अभियंता अमित दळवी, पर्यावरण अभियंता अवधूत नेर्लेकर, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे यांनी केले.
घरामध्येच विसर्जनाला प्राधान्य
यंदा नागरीकांनी घरामध्येच गणरायाला निरोप देण्यास प्राधान्य दिले. काही नागरीकांनी शाडूच्या मुर्ती थेट पाण्याच्या बादलीमध्ये तर प्लॅस्टरच्या मुर्ती मोठ्या हौदामध्ये विसर्जीत केल्या. उपनगरात बहुतांशी नागरीकांनी अशाच पद्धतीने विसर्जन केले.
150 टन निर्माल्य जमा
नागरिकांनी अर्पण केलेले 150 टन निर्माल्य 9 डंपर व 3 ट्रॅक्टरद्वारे पहाटे पर्यत गोळा करण्यात आले. या सर्व निर्माल्याचे वर्गीकरण करुन पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पीटल येथे पाठविण्यात येणार आहे. या निर्माल्यातून खत तयार करण्यात येणार आहे. एकटी, संस्थेच्या महिलांच्याकडून निर्माल्याचे विलगीकरण करुन खत निर्मिती प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी अवनी, एकटी व वसुंधरा या संस्थेच्या 150 महिला काम करत आहेत.
207 विसर्जन कुंडांची स्वच्छता
महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी 207 ठिकाणी कृत्रिम कुंड उभारण्यात आले होते. या सर्वच ठिकाणची महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तात्काळ स्वच्छता करण्यात आली. शुक्रवारी दिवसभरात ही स्वच्छता करुन हे कुंड हटविण्यात आले.
पोलिसांकडून रात्रभर गस्त
महापालिकेसोबतच पोलीस प्रशासनानेही 207 विसर्जन कुंडाच्या येथे गस्त घालण्यात आली. विसर्जन कुंडानजीक कोणतीही मुर्ती अनावधानाने राहू नये यासाठी पोलीस प्रशासनाने ही यंत्रणा राबविली होती. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी 207 विसर्जन कुंडांची माहिती घेवून त्याची जबाबदारी प्रत्येक पोलीस स्टेशननिहाय ठरवून दिली होती. यानुसार पोलीस स्टेशनच्या अंमलदारांना तेथील अधीकाऱ्यांनी सुचना दिल्या होत्या. रात्री 10 नंतर पहाटे 2 वाजेपर्यंत सर्वच विसर्जन कुंडाच्या येथे गस्त घालून तेथील मुर्ती संकलीत झाल्या की नाही याची पडताळी पोलीसांच्या वतीने करण्यात आली.
शहरातील घरगुती गणेश मूर्ती सार्वजनिक मंडळ
2022 51 हजार 500 1 हजार
2023 55 हजार 350 1 हजार 198
2024 56 हजार 372 ----