जिल्ह्यात 3 लाख गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन ! पुढच्या वर्षी लवकर या..ची साद घालत गौरी-गणपतीला भावूक वातावरणात निरोप
कृत्रिम विसर्जन कुंडात गणेशमुर्ती विसर्जन गणेशभक्तांचा प्रतिसाद; 535 टन निर्माल्याचे संकलन
कोल्हापूर प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशी साद घालत शहर आणि जिह्यात भावूक वातावरणात घरगुती गौरी-गणपतींचे गुरुवारी विसर्जन झाले. जिल्ह्यातील गणेशभक्तांनी जिल्हाप्रशासन, महापालिकेने ठेवलेल्या कृत्रिम जलकुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करत यंदाही पर्यावरणपुरक गणेश विसर्जनचा जागर केला. जिल्ह्यात सायंकाळी सात वाजेपर्यंत 2 लाख 58 हजार 837 तर शहरात रात्री दहा वाजपर्यंत 50 हजार 986 अशा एकूण तीन लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले. तसेच 535 टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले.
शहरासह जिल्ह्यात दुपारी दोनपासून विविध वाद्यांच्या गजरात गल्ली-गल्लीतून ताफ्याने विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. आबालवृद्धांच्या प्रचंड सहभागात झालेल्या या सोहळ्यात मुली आणि महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग राहिला. रात्री नऊपर्यंत नागरिक लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पाणवठ्याच्या व कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी येत होते. शहरातील राजाराम बंधारा, रंकाळा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, रुईकर कॉलनी, मंगेशकरनगर आदी ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जन झाले. पंचगंगा घाटावर सकाळी आठ वाजता पहिली मूर्ती विसर्जनासाठी आली. दुपारी तीनपर्यंत येथे तुरळक प्रमाणात गर्दी राहिली. त्यानंतर मात्र येथे गर्दीने उच्चांक गाठला. घाटापासून तोरस्कर चौक आणि गंगावेसपर्यंत रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. हिंदुत्ववादी संघटनांच्या आहवानाला साद देत अनेकांनी पंचगंगा नदी पात्रात भक्तीभावाने मूर्ती विसर्जन करण्याला प्राधान्य दिले असले तरी यंदा महापालिकेने जागोजागी ठेवलेल्या कुंडात पर्यावरणपूरक विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महापालिका, पंचगंगा घाट संवर्धन समिती आणि विविध पर्यावरणप्रेमींच्या वतीने येथे मंडप उभारून काहिली ठेवण्यात आल्या होत्या. त्याच्याच बाजूला निर्माल्य संकलित केले जात होते. अनेक भावीक स्वयंस्फूर्तीने येथे पर्यावरणपूरक विसर्जन करत होते. कसबा बावड्यात मूर्ती दान उपक्रम यशस्वी झाला. पण पंचगंगा घाटावर भाविकांनी नदीत मूर्ती सोडण्यास प्राधान्य दिले. पर्यावरणपूरक विसर्जन झालेल्या मूर्ती सजविलेल्या ट्रॉलीतून इराणी खणीत विसर्जनासाठी नेण्यात आल्या. संकलित झालेले निर्माल्य नेण्याचे काम शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होते. दरम्यान, महापालिकेने या उपक्रमासाठी मोठी यंत्रणा राबवली. नदी घाटासह सर्वच विसर्जन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैणात होता. मनपाची अग्निशमन व जीवरक्षक यंत्रणेसह सामाजिक संघटनांचे स्वयंसेवक सतर्क होते.
पंचगंगा घाटावर झिम्मा-फुगडीचा फेर आणि सामूहिक भोजनाची परंपरा काही महिलांनी आवर्जून जपली. रंकाळा तलावात विसर्जन करण्यापेक्षा इराणी खण येथे मोठी गर्दी झाली. मूर्तिसंकलित उपक्रमासही चांगला प्रतिसाद मिळाला. रंकाळा चौपाटी, संध्यामठ, दत्तोबा तांबट कमान, इराणी खण येथे विसर्जनाची व्यवस्था होती. कोटीतिर्थ तलाव आणि राजाराम तलावा येथेही भाविकांची गर्दी होती. कसबा बावडा पंचगंगा घाटावर पर्यावरणपुरक विसर्जन झाले. सर्रास भाविक मूर्ती दान करताना दिसत होते. शहरात सुमारे 207 ठिकाणी महापालिकेनं पर्यायी विसर्जनासाठी कुंड ठेवले होते. नागरिकांनी येथे मूर्ती दान करण्यास पसंदी दिली. त्यामुळे नदी घाटावर होणारी गर्दी विभागली होती. या सर्वच ठिकाणी दान केलेल्या मूर्तींसाठी महापालिकेने ट्रॅक्टरची व्यवस्था केली. सायंकाळी पाचनंतर गर्दी होण्यास सुरवात झाली. रंकाळा चौपाटी येथे स्वतंत्र व्यवस्था होती. तांबट कमान येथे सायंकाळी सहानंतर गर्दी झाली. निर्माल्य पाण्यात विसर्जन न करता कुंडात टाकण्यास प्राधान्य दिले गेले. ढोल-ताशांचा कडकडाट, बाप्पा मोरयाचा गजर अशा उत्साही आणि चैतन्यदायी वातावरणात विसर्जन झाले.