महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रावणमध्ये भाजपला धक्का; कट्टर राणे समर्थक ठाकरे सेनेत

04:00 PM Nov 15, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कुडाळ-मालवणमध्ये घराणेशाहीला थारा देऊ नका; श्रावण मधील प्रवेशकर्त्यांचे जनतेला आवाहन

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. यादरम्यान, मालवण तालुक्यात ठाकरे शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे.काल मालवण तालुक्यातील श्रावण गावातील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले की, यावेळी कुडाळ-मालवण मतदारसंघातून आमदार वैभव नाईक हेच विजयाची हॅट्रिक करतील. यावेळी प्रवेशकर्त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, कुडाळ-मालवण मतदारसंघामध्ये घराणेशाहीला आपण थारा देता कामा नये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासदार-आमदार हे एकाच कुटुंबातील आहेत. तर यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांचा विकास होणे गरजेचे होते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला नाही. जिल्ह्यात केवळ घराणेशाहीच दिसून आली. परंतु, यावेळी विद्यमान आमदार वैभव नाईक यांना पुन्हा विजयी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. श्रावण गावामधून सर्वाधिक मताधिक्य यावेळी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनाच मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागील दहा वर्षात श्रावण गावामध्ये अनेक विकासकामे आमदार वैभव नाईक यांच्या विकासनिधीतून झाली आहेत. आज राज्यातील महायुतीचे सरकार हे केवळ धनाड्यांचे सरकार आहे. मात्र, सामान्य जनतेला या सरकारने काहीच दिलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला. मात्र, शिंदे सरकारच्या काळात हा विकासनिधी खुंटला असल्याची टीकाही प्रवेशकर्त्यांनी यावेळी केली.मागील निवडणुकीमध्ये एक दिलासा म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना येथील जनतेने खासदारकीच्या निवडणुकीत निवडून दिले. मात्र, खासदार झाल्यापासून नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कोणती कामे केली हे त्यांनी जनतेला सांगावे, असा सवाल प्रवेशकर्त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी आपण कुडाळ-मालवणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. मागील १० वर्षांमध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघात अनेक विकासकामे ही करण्यात आली आहेत. रस्ते, पूल, पाणी योजना या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात पूर्णत्वास आल्या असेही आमदार वैभव नाईक यांनी म्हटले.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी गावातील शिवसेनेत प्रवेश केलेल्या कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आपण विकासासाठी शिवसेनेत आलात त्यामुळे आपला योग्य तो सन्मान राखला जाईल असेही आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिले. मागील दहा वर्षांमध्ये या विभागाचा आमदार म्हणून काम करताना मी सामान्य लोकांचे प्रश्न काय आहेत हे जवळून पाहिले आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्नही केले आहेत. परतीच्या पावसामुळे या भागातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. पाच वर्षापूर्वी सुद्धा परतीचा पावसामुळे या भागात भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तत्काळ भरपाई शेतकऱ्यांसाठी लागू केली होती. श्रावण गावातील अनेक विकासकामे पूर्णत्वास झालेली आहेत. येथील सभामंडप,रस्ते हे पूर्ण झालेले आहेत. आम्ही सातत्याने लोकांमध्ये जात असतो आम्हाला भीती असते की, उद्या आम्ही लोकांमध्ये गेल्यानंतर लोक आम्हाला काय विचारतील त्यामुळे आम्ही नेहमीच विकासकामे करण्यावर भर देतो. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबीयांवर टीका करताना म्हटले की, एकीकडे खासदार आहेत, एक मुलगा आमदार आहे. यांना तुमचा विकास करायचा नाही तर त्यांना आपल्या घराचे वासे बदलण्यासाठी विकास करायचा आहे. राणे केंद्रात मंत्री होते. परंतु, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती उद्योग आणले हे त्यांनी स्पष्ट करावे. आज नियती कशी बघा ज्या बाळासाहेबांना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनाच आज बाळासाहेबांचा धनुष्यबाण घ्यावा लागतो. धनुष्यबाण घेताना लाचार होऊन घ्यावा लागतो. भाजप नेहमी सांगते पहिले राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः पण राणे हे जिथे असतात तिथे पहिला मुलगा, दुसरा मुलगा आणि तिसरी सत्ता असते. हे आपल्याला नको आहे. हे आपण जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे असे आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले. यावेळी विकी सावंत,निलेश सडेकर,सिद्धेश सडेकर,संदेश सडेकर, प्रशांत सावंत,भाई सावंत आर्यन कावते या कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अडवली माडली विभाग प्रमुख बंडू चव्हाण,माजी विभागप्रमुख प्रवीण परब,श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे,उपसरपंच दुलाजी परब, शाखाप्रमुख स्वप्निल दळवी,अभी पवार,समीर परब,विठ्ठल घाडी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article