महाराष्ट्रातील नेत्यांना आज प्रवेशबंदी
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, सीमावासियांचा लढा चिरडण्याचा प्रयत्न
बेळगाव : वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी न्यायमार्गाने सुरू असलेला लढा चिरडण्यासाठी या ना त्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. काळ्यादिनावेळी सीमावासियांच्या मागे पाठबळ उभे करण्यासाठी बेळगावला येण्याचे जाहीर करणाऱ्या महाराष्ट्रीय नेत्यांना शनिवारी बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. खासदार धैर्यशील माने, शिवसेनेचे विजय शामराव देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे, सुनील मोदी आदी निपाणीमार्गे शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी बेळगावला येणार होते. त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.
एकीकडे राज्योत्सव साजरा केला जातो. त्याचवेळी सीमावासीय काळादिन पाळतात. सायकल फेरीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार व्यक्त करतात. काळ्यादिनात भाग घेण्यासाठी अनेक महाराष्ट्रीय नेत्यांनी बेळगावला येण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या बेळगाव दौऱ्यावर बंदी घालण्यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुखांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. काळ्यादिनात महाराष्ट्रीय नेत्यांनी भाग घेतला तर बेळगावात त्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे भाषिक तेढ वाढू शकतो. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे कारण देत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदीचा आदेश दिला आहे. शिवसेनेच्या नेते-कार्यकर्त्यांना सीमेवरच अडविणे योग्य ठरणार आहे, असा प्रस्ताव पोलीसप्रमुखांनी पाठविला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे.