For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनवासी महिलांचे उद्योजक सक्षमीकरण!

06:11 AM Mar 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
वनवासी महिलांचे उद्योजक सक्षमीकरण
Advertisement

कुटिरोद्योग व स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्याच जोडीला आता अदिवासी-वनवासी परिसरातील महिलांना परंपरागत स्वरुपातील छोटेखानी उद्योग सुरु करून या स्वयंरोजगारांद्वारे ग्रामीण व वनवासी क्षेत्रातील महिलांनी  आत्मविश्वासपूर्ण सक्षमीकरणाच्या जोडीलाच आपले स्वत:चे, छोटेखानी असले तरी स्वत:चे असे व्यावसायिक आर्थिक विश्व साकारले असून त्याचीच ही कथा.

Advertisement

परंपरागतरित्या पाहता ग्रामीण क्षेत्राप्रमाणेच भारतातील वनवासी क्षेत्रातील मुली व महिलांमध्ये कल्पकता, नाविन्यता, क्षमता, कौशल्य, मेहनतीपणा व जिद्द इ. गुण आवर्जुन आढळतात. अर्थात त्याचवेळी हे प्रकर्षाने जाणवते की वनवासी महिलांना त्यांच्याजवळ असणाऱ्या या विशेष गुण कौशल्यांची पुरेशी जाणीवच नसते. असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या वनवासी क्षेत्रात त्याचे भौगोलिक स्वरुप व दुर्गमता यामुळे शिक्षण, आरोग्य सुविधा, परस्पर संपर्क, संवाद या बाबी अगदीच जुजबी स्वरुपात उपलब्ध असतात. बहुसंख्य ठिकाणी तर या बाबींची वानवाच असते. यातील मूळ व मुलभूत मुद्दा म्हणजे शिक्षणाचा ठरतो. मर्यादित  वा नगण्य स्वरुपातील शिक्षणामुळे ग्रामीण व वनवासी या उभय क्षेत्रातील मुली आणि महिलांच्या विकासाची सुरुवात होतच नाही. अथवा काही सुरुवात झालीच तर ती नेहमी मर्यादित स्वरुपातीलच असायची.

अर्थात वनवासी क्षेत्रातील पुढची पिढी असणाऱ्या मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी तेथील वनवासी शाळांमधील शिक्षणाला गुणात्मक दर्जाची जोड देण्याचे प्रयत्न निश्चितपणे होत आहेत. याचा मुख्य भर हा वनवासी भागातील विशेषत: शिक्षित मुलींना त्यांच्या औपचारिक शिक्षणाच्या जोडीलाच त्यांच्यातील कला, कौशल्याला वाव देतानाच अशा कौशल्यप्राप्त वनवासी विद्यार्थिनींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन मार्गदर्शन दिले जाते. याचे अपेक्षित परिणामसुद्धा दिसू लागले आहेत.

Advertisement

यासंदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणून झारखंड या वनवासी बहुल राज्यातील झारखंड राज्य जीवनस्तर विकास संस्थेने राज्यातील जोन्हा येथे     आशान फौंडेशनच्या प्रयत्न आणि उपक्रमाचा उल्लेख करावा लागेल. संस्थेतर्फे प्रामुख्याने वनवासी मुली आणि महिलांना स्वयंरोजगाराचे यशस्वी धडे दिले जातात. झारखंड राज्य जीवनस्तर विकास संस्थेतर्फे प्रकाशित केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार संस्थेच्या प्रयत्नांतून स्वत:चा छोटा व्यवसाय करणाऱ्या 2500 वर वनवासी महिला त्यांच्या परंपरागत व कुटिरोद्योगातून लखपती बनल्या आहेत. मुख्य म्हणजे या महिलांनी त्यांचा घरगुती व्यवसाय घरच्याघरी व गाव परिसरात राहूनच हे सारे साध्य केले आहे.

जीवनस्तर विकास संस्थेने झारखंडमध्ये वनवासी महिलांच्या विकासार्थ चालविलेल्या दुसऱ्या टप्प्यात खास वनवासी विद्यार्थिनींसाठी व्यवसाय शिक्षणासह कौशल्य विकास उपक्रमाला प्राधान्य दिले आहे. यामध्ये या महिलांना त्यांच्या कुटिरोद्योगातून आर्थिक लाभ मिळण्याच्या जोडीलाच त्यांच्याशी संबंधित व फायदेशीर ठरू शकतील, अशा ग्रामीण व वनवासी भागातील कुटिरोद्योग सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. यामध्ये कृषी, परंपरागत कलाकुसर व त्याशिवाय ग्रामीण संदर्भातील मुलभूत तंत्रज्ञानावर आधारित कुटिरोद्योग इ. चा आवर्जून समावेश करण्यात आला आहे.

वनवासी महिलांना गृहोद्योगाद्वारे सक्षमीकरणाचा मार्ग दाखविणाऱ्या या यशस्वी प्रयत्नांमुळे ग्रामीण व वनवासी क्षेत्राला नवी दिशा देण्याचे महनीय काम यशस्वीपणे करून दाखविले आहे. यातून वनवासी भागातील विशेषत: त्या भागातील वनवासी पालकांना आता खात्री पटली आहे की मुलभूत शिक्षणाला कौशल्य विकास व प्रशिक्षणाची  जोड दिल्यास या मुली यशस्वी लघु-उद्योजक तर होतातच. त्याशिवाय त्या घराला आर्थिक मदत करतांनाच स्वावलंबी सुद्धा होतात. झारखंडच्या जोन्हा परिसरातील प्रियंका मुंडा व आरती मुंडा या वनवासी भगिनींची यशोगाथा प्रेरक, मार्गदर्शक ठरते. आपले प्रयत्न आणि जिद्द या आधारे आपापल्या परिसरातच कुटिरोद्योगाला यशस्वी प्रस्थापित केल्याबद्दल या वनवासी मुलींची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. यापैकी प्रियंका मुंडाला ‘यंग लीडर्स फॉर अॅक्टिव्ह सिटिझनशिप’ ची फेलोशिप तर आरती मुंडाला रिलायन्स फौंडेशनतर्फे अमेरिकेच्या व्हायटेल व्हॉईसेसची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या फेलोशिपमुळे देशातील वनवासी तरुणींच्या उद्यमी प्रयत्नांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर तर घेण्यात आलीच, त्याशिवाय त्यांच्या सारख्या झारखंडमधील इतर वनवासी तरुणींना स्वत:चा व स्वबळावर कुटिरोद्योग सुरु करण्याची महनीय प्रेरणा मिळाली हे विशेष.

याचाच परिणाम म्हणून आज आपल्याकडील वनवासी मुली आज वनक्षेत्रातील पानांच्या द्रोणापासून अभियांत्रिकी व तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन बनविण्यामध्ये सहभागी होण्याबरोबरच सहभागी होत आहेत. याशिवाय विशेषत: ग्रामीण क्षेत्राला कायमस्वरुपी भेडसावणाऱ्या अन्न सुरक्षा पर्यावरण संरक्षण इ. क्षेत्रात काम करतानाच वन आणि वनवासींचा विकास करण्याचे काम करून इतरांसह त्यांच्या समाजाला व्यावसायिक आत्मविश्वासासह यशस्वीपणे वनाधारित कुटिरोद्योग केले जाऊ शकतात, याचा वस्तुपाठ सुद्धा दिला आहे.

धोरणात्मक निर्णयाच्या स्वरुपात आता शासकीय स्तरावर व विशेषत: वनवासी क्षेत्रात उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांना लघु उद्योग वा व्यवसायच नव्हे तर आर्थिक सामाजिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये उद्योजकतेसाठी आवश्यक असे कर्ज व आर्थिक सहाय्य, विक्री व्यवस्था, लघू उद्योजकतेसाठी आवश्यक व्यवस्थापन प्रशिक्षण इ. चा प्रामुख्याने समावेश आहे. यातून वनवासी महिलांना घरीच नव्हे तर गाव आणि समाज पातळीपर्यंत सक्षमीकरणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे.

यातूनच ग्रामीण आणि वनवासी या दोन्ही दुर्मिळ क्षेत्राच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत लक्षणीय स्वरुपाचे बदल होत आहेत. वनवासी उद्योजकतेतून साध्य झालेल्या या बदलांमुळे विशेषत: आजवर वनवासी क्षेत्रात महिलांच्या सुप्त उद्योजक गुणांना यामुळे उजाळा तर मिळालाच, त्याशिवाय त्यांच्या प्रयत्नातून साध्य झालेल्या आर्थिक उलाढाल व कुटुंबात उत्पन्नवाढीसाठी सबळ प्रयत्न झाल्याने वनवासी महिला आर्थिक, सामाजिक या दोन्ही दृष्ट्या सक्षम आणि सबळ होण्याचा मोठा फायदा झाला आहे. याचे प्रत्यंतर वनक्षेत्र वा गाव पातळीवर महिलांना उंबऱ्यापासून चावडीपर्यंत त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या रुपाने मान आणि मान्यता मिळू लागली आहे. घरच्या हिशेबापासून ग्राम महिला मंडळ वा महिला बचत गटाच्या व्यवहार वा उलाढालीपर्यंतची कामे या ग्रामीण महिला नेटके आणि नेमकेपणे करू लागल्या आहेत. त्यांची दखल सर्वत्र घेतली जात आहे. यातून त्यांना सर्व व्यवहारांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी मिळू लागली आहे.

अशा प्रकारे झारखंडसारख्या राज्याच्या दुर्गम व वनवासी विभागात तेथील मुली आणि महिलांनी परंपरागत चाकोरीपुढे जाऊन शासन प्रशासनाच्या सहकार्याने विकास विभागाच्या मार्गदर्शनाने व मुख्य म्हणजे स्वत:ची जिद्द व प्रयत्नांद्वारा वनावर आधारित कुटिरोद्योगांच्या माध्यमातून आपल्या कौटुंबिक आर्थिक विकासासह ग्रामीण उद्योजकतेतून अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे.

देशपातळीवर लघू उद्योगांना प्रोत्साहनपर चालना मिळतानाच या ग्रामोद्योगी विकास योजनेत ग्रामीण व महिला लघू उद्योजकांना सहभागी करण्याचे झारखंड जीवनविकास प्रकल्पाने आपल्या यशस्वी वाटचालीतून महिलांची क्षमता कार्यक्षमता व सबलतेची खात्री सर्वांना करून एक अनुकरणीय वाटचाल सुरु ठेवली आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.