मिरज एमआयडीसीतील उद्योजक उतरणार रस्त्यावर
कुपवाड :
मिरज औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. वाहतुकीवर परिणाम होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे. निचऱ्याची व्यवस्था नसल्याने सांडपाणी कारखान्यामध्ये शिरत आहे. बंद पडलेले पथदिवे, खड्डेमय रस्ते यावरून सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मिरज एमआयडीसीतील खराब रस्ते व खड्ड्यांची समस्या उद्योजकांनी महानगरपालिका आयुक्तांसमोर वारंवार मांडली आहे. आयुक्तांनी पाहणी करून नवीन रस्ते करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
शासनाने उद्योजकांना एमआयडीसी मार्फत भाडेतत्त्वावर भूखंड, महावितरण तर्फे वीज आणि इतर मूलभूत सुविधा पुरवल्या. एमआयडीसीने महापालिकेशी करार करून रस्ते, पथदिवे देखभाल व दुरस्ती करण्यासाठी महानगरपालिकेकडे वर्ग केले. पर्यायाने उद्योजकांना महानगरपालिकेकडे मालमत्ता कर भरण्यास भाग पाडले. नैसर्गिक नाले बुजल्याने औद्योगिक वसाहतीत सांडपाणी साचत आहे. परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. निचरा व्यवस्था नसल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारला जिल्ह्यातील उद्योजकांकडून हजारो कोटी जीएसटी जातो. महापालिकेला दोन कोटी एवढा महसूल देणाऱ्या उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार समस्या मांडूनही कार्यवाही होत नसल्याची उद्योजकांची तक्रार आहे. मिरज एमआयडीसीचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते ट्रीमिक्स पद्धतीने व्हावे, अशी मागणी केली होती. मागील काही वर्षात औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग वाढले, कामगारांची संख्या, वाहतूक देखील वाढली आहे. तुलनेने रस्त्यांची अवस्था बदलली नाही. रुंदीकरण न झाल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याकडे मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष हर्षल खरे, मनोज पाटील, अतुल पाटील, हेमंत महाबळ, संजय अराणके, माधव कुलकर्णी, संजय खांबे, के. एस. भंडारे यासह असोसिएशच्या संचालकांनी लक्ष वेधले होते. जुन्या मिरज औद्योगिक क्षेत्रांत तीनशे कारखाने असून १५ हजार कामगार आहेत. औद्योगिक वसाहतीमधील सुविधांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. मिरज एमआयडीसी क्षेत्राबाबतीत काहीसे नकारात्मक चित्र असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना या भागाविषयी चांगली जाण आहे. या भागात चांगल्या सुविधा मिळण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रकातदादांना भेटून चर्चा केली.