केंद्र सरकारकडून ‘एंटीटी लॉकर’ उपलब्ध
कागदपत्र व्यवस्थापनाकरिता संस्थांना होणार लाभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने भारतील विविध संस्थांना सोयीचे होईल, असे ‘एंटीटी लॉकर’ साधन उपलब्ध करुन दिले आहे. ही डिजिटल सुविधा आहे. तिचा उपयोग महत्वाची सरकारी कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. अशी कागदपत्रे या साधनातील ‘क्लाऊड बेस्ड’ प्लॅटफॉर्मवर साठवता येऊ शकतात.
या सुविधेचा उपयोग भारतात नोंदणी करण्यात आलेल्या कोणत्याही संस्थेला करता येऊ शकतो. नोंदणी कागदपत्रे, करविवरणपत्रे, भविष्यनिर्वाह निधीसंबंधातील कागदपत्रे आणि अन्य कोणतीही महत्वाची कागदपत्रे आणि त्यांच्या फाईल्स या प्लॅटफॉर्मवर सुरक्षितपणे साठविल्या जाऊ शकतात आणि त्यांचा हवा तेव्हा उपयोगही करता येऊ शकतो. ही सुविधा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने उपलब्ध करुन दिली असून केंद्र सरकारच्या ‘गव्हर्नमेंट टू बिझनेस’ या योजनेला पूरक अशी ही योजना असल्याची माहिती देण्यात आली.
उपयोग असा करता येईल...
भारतात नोंदणी करण्यात आलेल्या कोणत्याही संस्थेला या डिजिटल सोयीचा उपयोग करता येऊ शकतो. यासाठी संबंधित नोंदणीकृत संस्थेला या साधनावर आपले नाव नोंदवावे लागणार आहे. आपला परिचय क्रमांक या साधनावर नोंद करुन आपली महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवता येऊ शकतील. त्यानंतर संस्थेच्या चालकांना अगर कंपनीचे संचालक आणि प्रवर्तकांना एंट्री लॉकरच्या वेबसाईटवर ही कागदपत्रे केव्हाही पाहता येणार आहेत. आतापर्यंत 500 हून अधिक नोंदणीकृत संस्था आणि कंपन्यांनी या योजनेत आपले खाते उघडले आहे.
गुप्ततेची शाश्वती
अत्याधुनिक एन्क्रिप्शन आणि ऑथेंटिकेशन यंत्रणेमुळे या साधनात संस्था किंवा कंपन्यांची सर्व कागदपत्रे गुप्त आणि सुरक्षित राहू शकतात. कोणतीही कागदपत्रे पाहण्यासाठी प्रत्येक वेळी संबंधित फाईल मागवून घेण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे कंपनी किंवा संस्थेच्या अधिकाऱ्यांचा वेळ वाचणार असून कागदपत्रांसंबंधीची कामे त्वरित होण्यास साहाय्य मिळणार आहे. अशा सोयीची मागणी काही काळापासून केली जात होती. ती आता पूर्ण करण्यात आली आहे.
अन्य अनेक उपयोग
या प्लॅटर्फार्मचा उपयोग करुन संस्थांचे किंवा कंपन्यांचे अधिकारी त्यांची कागदपत्रे डिजिटली हाताळू शकणार आहेत. त्यामुळे कागपदत्रांच्या प्रत्यक्ष हाताळणीमुळे कागदपत्रे खराब होण्याची चिंता राहणार नाही. मूळ कागदपत्रे वारंवार पाहण्यासाठी मागवावी न लागणार असल्याने ती अधिक सुरक्षित राहणार आहेत, अशी माहितीही केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे.
कायदेशीरदृष्ट्या वैध
ही ‘एंटीटी लॉकर’ योजना कायदेशीरदृष्ट्या वैध असून माहिती गुप्तता आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करुन बनविण्यात आली आहे. त्यामुळे ती सुरक्षित आणि सोयीची आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. वास्तविक ही योजना ऑगस्ट 2024 पासूनच उपलब्ध करुन देण्यात आली होती. तथापि, तिची अधिक माहिती आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग अधिकाधिक संस्था आणि कंपन्यांकडून केला जाईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.