शॉर्टसर्किटमुळे आगीत संपूर्ण घर भस्मसात
लांजा :
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर बेचिराख झाल्याची घटना तालुक्यातील पालू-चिंचुर्टी बावडेवाडी येथे बुधवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. सुदैवाने पर बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील सर्व सामान आणि कपडे जळून खाक झाले. यात अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
तालुक्यातील पूर्व दुर्गम भागात असलेल्या पालू-चिंचुटी धावडेवाडी येथे प्रकाश रघुनाथ धावडे यांचे घर आहे. प्रकाश धावडे यांचे सर्व कुटुंब हे नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबईत राहतात. त्यामुळे घर बंद असते. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास घराला आग लागली. काही काळातच आगीने रौद्र रूप धारण केले. धावडे यांच्या घराशेजारी अन्य घरे असल्याने सर्व ग्रामस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने घर पूर्णतः बेचिराख झाले. घरातील भांडी, कपडे, कपाट व अन्य सामानाची राखरांगोळी झाली. घराला आग लागल्याची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर राजापूर नगर परिषदेचा अग्निशमन बंब मागवला. मात्र, पालू-चिंचुर्टी हा दुर्गम भाग असल्याने बंद पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला.