दौडमध्ये धारकऱ्यांचा उत्साह कायम
आज सांगता : हभप शिरीष मोरे महाराज देहूकर यांची उपस्थिती : बाल मावळ्यांसह महिलांचा उदंड प्रतिसाद
बेळगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत शुक्रवारी शहरात विविध मार्गावर दुर्गामाता दौड नवव्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडली. ठिकठिकाणी महिलांनी आरती करून दौडचे स्वागत केले. शिवाय फुलांचा वर्षावही करण्यात आला. बाल मावळ्यांसह महिला आणि धारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या दौडमधील धारकऱ्यांचा उत्साह कायम आहे. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणेने शुक्रवारीही शहर परिसर दणाणून गेला. दौड मार्गावर भगवे ध्वज, भगव्या पताका आणि भगवे फुगे लावण्यात आले होते. त्यामुळे वातावरणातही चैतन्य निर्माण झाले होते. बालमावळे आणि महिलांनी वेशभूषा करून सहभाग दर्शवला.
नवव्या दिवशीच्या दौडला ताशिलदार गल्ली येथून प्रारंभ झाला. दौडसाठी शेवटचा एकच दिवस शिल्लक राहिल्याने शुक्रवारी मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते. ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरात उद्योजक प्रकाश चौगुले, प्रकाश जुवेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि प्रेरणामंत्राने दौडला प्रारंभ झाला. रघुनाथ दौलतराव डुबल-इनामदार, जयाजीराव मोहिते यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. सोमनाथ मंदिरापासून सुरू झालेली दौड ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, मीनाक्षी हॉटेल क्रॉस, मुजावर गल्ली, कांगली गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, महाद्वार रोड, तानाजी गल्ली, समर्थनगर क्रॉस नं. 4, क्रॉस नं. 5, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपुलावर शनिमंदिर येथे पोहोचली. या ठिकाणी आरती आणि ध्येयमंत्राने शुक्रवारच्या दौडीची सांगता झाली. शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांच्या हस्ते ध्वज उतरविला.
आज दौडची सांगता
घटस्थापनेपासून शहर परिसरात देव, देश आणि धर्मासाठी चाललेल्या दुर्गामाता दौडची धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता होणार आहे. यावेळी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हभप शिरीष मोरे महाराज देहूकर उपस्थित राहणार आहेत. धारकरी, शिवभक्तांना ते मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी शेवटचा दिवस असल्याने धारकऱ्यांची संख्याही लक्षणीय असणार आहे. शिवाय तालुक्यातील विविध गावातून धारकरी दाखल होणार आहेत. त्यामुळे धर्मवीर संभाजी चौकात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
शिवप्रतिष्ठानतर्फे विशेष सत्कार
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दौडच्या नवव्या दिवशी खास उपस्थित असलेल्या रघुनाथ दौलतराव इनामदार, जयाजीराव मोहिते, सौरभ कर्डे यांचा शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
दुर्गामाता दौड शक्ती अन् भक्ती- शिवव्याख्याते सौरभ कर्डे
दुर्गामाता दौड ही शक्ती आणि भक्तीचा मेळ घालणारी आहे. बेळगाव शहरात दुर्गामाता दौडला वाढत जाणारा प्रतिसाद हा त्याचेच एक उदाहरण. देशाच्या बाहेर लढण्यासाठी लष्करी जवान कार्यरत आहेत. त्याप्रमाणे देशांतर्गत रक्षणासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची फौज सदैव तत्पर आहे. दरवर्षी धारकरी शिवभक्तांच्या वाढत्या प्रतिसादामुळे दौडला पंढरीच्या वारीचे स्वरुप प्राप्त होऊ लागले आहे, असे गौरवोद्गार पुणे येथील युवा शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी काढले. शुक्रवारी ताशिलदार गल्ली येथून सुरू झालेल्या दौडची पाटील गल्ली येथील शनिमंदिराजवळ सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सदाशिवगड येथील थोरले शाहू महाराज यांचे साडू सरदार बाळोजी डुबल-इनामदार यांचे वंशज रघुनाथ दौलतराव डुबल-इनामदार, जयाजीराव मोहिते, कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यासह मान्यवर उपस्थित होते.
कर्डे पुढे म्हणाले, वारकऱ्यांचे माहेरघर असलेल्या पंढरपुरात जसा वैष्णवांचा मेळावा भरतो, त्याप्रमाणे दौडचे व्यापक दृश पहावयास मिळत आहे. हे केवळ धर्मरक्षणासाठीच सुरू आहे. याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळते. शिवरायांच्या माँसाहेब असलेल्या जिजाऊंचा संस्कार अन् आदर्शाची खरी गरज आजच्या महिलांना आहे, असेही ते म्हणाले. स्वराज्याच्या सीमा राखण्याचे काम सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केले. जो खंबीर तो गंभीर असा पराक्रम त्यांनी गाजवला. भारतमातेला पुढे नेण्याचे काम शिवरायांच्या मावळ्यांनी केले आहे, असे सांगत रायगड येथील 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी प्रसार, प्रचार आणि जागृती करूया, असे आवाहनही त्यांनी केले.