For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरात घुसून वृद्धेचे दहा तोळे दागिने लांबवले

11:45 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
घरात घुसून वृद्धेचे दहा तोळे दागिने लांबवले
Advertisement

चाकूचा धाक दाखवून लुटले : महाद्वार रोड परिसरात खळबळ : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर

Advertisement

बेळगाव : चाकूचा धाक दाखवून महाद्वार रोड येथील एका वृद्धेच्या अंगावरील दागिने लुटण्यात आले. सोमवारी सायंकाळी घरात घुसून हे कृत्य करण्यात आले आहे. या घटनेने महाद्वार रोड परिसरात एकच खळबळ माजली असून सुमारे दहा तोळ्यांचे दागिने भामट्याने पळविल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिक व एकटी राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दागिने लुटल्यानंतर वृद्धेच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या भिंतीवरून उडी टाकून भामट्याने पलायन केले आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

मराठा गल्ली, महाद्वार रोड येथील जयश्री रेवणकर (वय 85) यांच्या घरात सोमवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास एक भामटा घुसला. जयश्री यांना नीट चालता येत नाही. वॉकरच्या साहाय्याने त्या चालतात. त्यांचा मुलगा गोव्यात असतो. त्यामुळे घरात त्या एकट्या असतात. घरात घुसलेल्या भामट्याने त्यांना चाकूचा धाक दाखवला. आरडाओरड केलीस तर तुला संपवतो, असे धमकाविले.

Advertisement

जयश्री यांच्या मानेवर चाकू ठेवून त्यांच्या अंगावरील दागिने भामट्याने काढून घेतले. इतकेच नव्हे तर घरातील तीन कपाट फोडून कपाटातील दागिनेही त्याने पळविले आहेत. जीवाच्या भीतीने जयश्री या पार घाबरून गेल्या होत्या. भामटा तेथून पळून गेल्यानंतर जयश्री यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना यासंबंधीची माहिती दिली. गल्लीतील नागरिक जयश्री यांच्या घरी जमा झाले. पोलीस येण्याआधी नागरिकांनीच भामट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र, तोपर्यंत भामट्याने तेथून पलायन केला होता. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

महाद्वार रोड परिसरात गांजा, पन्नी विक्री जोरात

महाद्वार रोड परिसरात गांजा, पन्नी विक्री जोरात सुरू आहे. मध्यरात्री 12 नंतर या परिसरात अमलीपदार्थांच्या विक्रीला सुरुवात होते. लहान मुले, तरुण पुड्या घेण्यासाठी या परिसरात येतात. या नशेबाजांमुळे स्थानिक नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. केवळ अमलीपदार्थांची विक्रीच नव्हे तर छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना धमकावून पैसे काढून घेण्याचे प्रकारही वाढले असून पोलिसांनी या परिसरातील नशेचे अड्डे बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.