पुढील 24 आठवडे पुरेल इतका चारासाठा
पशुसंगोपनचा दावा : उन्हाळ्यात टंचाई निर्माण होण्याची भीती : 15 कोटींची निविदा प्रक्रिया
बेळगाव : यंदा पावसाच्या प्रमाणात घट झाली असली तरी 15 लाख मेट्रिक टन चारासाठा शिल्लक आहे. शिवाय पुढील 24 आठवडे चारा तुटवडा निर्माण होणार नाही, असा दावा पशुसंगोपन खात्याने केला आहे. मात्र प्रत्यक्षात पाण्याअभावी चारा टंचाई निर्माण झाल्याचे समोर येत आहे. शिवाय खबरदारी म्हणून चाऱ्यासाठी 15 कोटींची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. गाय, म्हैस, घोडा, गाढव, शेळ्या, मेंढ्या यांना चाऱ्याची गरज आहे. मात्र यंदा पावसाअभावी अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे वैरणीचा प्रश्नही भविष्यात गंभीर बनण्याची शक्यता आहे. सध्या ऊसतोडणी सुरू झाल्याने ओला चारा काही प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र रायबाग, सौंदत्ती, बैलहोंगल तालुक्यांमध्ये चारा टंचाईचे संकट गडद होणार आहे. पशुसंगोपनने 15 लाख 405 मेट्रिक टन चारासाठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात पावसाअभावी ओल्या आणि सुक्या चाऱ्याची टंचाई निर्माण होणार आहे. विशेषत: एप्रिल, मे दरम्यान चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सकस आहार मिळावा, यासाठी बी-बियाणांचे वाटप
पशुसंगोपनने चारा टंचाई निर्माण होवू नये यासाठी दर्जेदार बी-बियाणांचे वितरण केले आहे. पशुपालकांच्या जनावरांना चांगल्या दर्जाचा आणि सकस आहार उपलब्ध व्हावा, यासाठी ज्वारी, मका, बी-बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र यंदा पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे नदी, नाले आणि तलावांची पाणी पातळी घटली आहे. काही ठिकाणी डिसेंबरपासूनच पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे चारा-पाण्याविना जनावरांचे हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दूध उत्पादनात घट होण्याची भीती
खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे काही भागात वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याबरोबर चाऱ्याची समस्याही गंभीर बनणार आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.