शत्रूबुद्धी विनाशाय
खुपदा असे होते की जिवलगांमध्ये अकस्मात शत्रुत्व निर्माण होते. नात्यांमधली दरी वाढत जाते. वैर, मत्सर आणि भय हे भाऊबंद त्या शत्रुत्वाला सहाय्य करतात. एखाद्या सामान्य माणसाचे आयुष्य त्यामुळे नासून जाते. अध्यात्माची वाट सापडली की त्या वाटेवरून पुढे जाताना संघर्ष करावा लागतो तो बरेचदा सख्ख्या नात्यांमध्ये होतो. ही परिस्थिती पुराणकाळापासून चालत आलेली आहे.
संध्याकाळ झाली की देवघरात देवापाशी आणि अंगणात तुळशीपाशी दिवा लावून नमस्कार केला की कातरवेळ मनाला अनामिक भीतीपासून दूर नेते. श्रीरामरक्षा, मारुतीस्तोत्र यांचा नाद घरात निनादला की मनात दडून असलेली पिशाच्चे दूर पळतात. तिन्हीसांजा ही लक्ष्मी सदनात येण्याची वेळ म्हणून तिची प्रार्थना दिवे लावून गृहिणी मनापासून करतात. एक जुनी ओवी अशी आहे, ‘तिन्हीसांजा झाल्या, दिव्यांची जलदी करा, लक्ष्मी आली घरा, मोत्यांनी ओटी भरा.’ अंधार दाटून आल्यावर घरी येणारी लक्ष्मी उजेडाचा दिलासा देणारी तर असतेच; शिवाय ती जेव्हा दीपज्योतीच्या रूपाने येते तेव्हा मनाच्या तळाशी असणारे शत्रुभय ती दूर करते अशी खात्री आपली परंपरा देते. संध्याकाळी लहानथोर मंडळी दिव्यासमोर प्रार्थना करतात. ‘शुभंकरोती कल्याणम आरोग्यम् धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते.’ त्यातली ‘शत्रूबुद्धी विनाशाय’ ही विनवणी फार महत्त्वाची आहे. जगणे आनंदी, सोपे, सहज आणि उन्नतीकडे जाणारे असावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यात मुख्य अडथळा हा शत्रूबुद्धीचा असतो. शत्रू कुठून, कधी, कसे आयुष्यात उगवतील हे कधीही सांगता येत नाही. त्यासाठी डोक्यात सकारात्मक, जाणता प्रकाश पडायला हवा. त्यामुळे वाईट ते सारे नष्ट होते आणि शाश्वत आनंदाची उजेडी पाऊलवाट सापडते. म्हणूनच दीपज्योतीला रोज करायची ही प्रार्थना मोलाची आहे.
खुपदा असे होते की जिवलगांमध्ये अकस्मात शत्रुत्व निर्माण होते. नात्यांमधली दरी वाढत जाते. वैर, मत्सर आणि भय हे भाऊबंद त्या शत्रुत्वाला सहाय्य करतात. एखाद्या सामान्य माणसाचे आयुष्य त्यामुळे नासून जाते. अध्यात्माची वाट सापडली की त्या वाटेवरून पुढे जाताना संघर्ष करावा लागतो तो बरेचदा सख्ख्या नात्यांमध्ये होतो. ही परिस्थिती पुराणकाळापासून चालत आलेली आहे. श्रीमद् भागवत ग्रंथ वाचताना नात्यांची गुंतवणूक जगण्याचे शिक्षण देते. ध्रुवबाळाचे आख्यान नात्यांमधले अनेक पदर उलगडून दाखवते. केवळ पाच वर्षांचा ध्रुवबाळ. त्याच्याजवळ बालबुद्धी आहे. त्यामुळे सर्वांठायी त्याची प्रेमबुद्धी आणि आदरबुद्धी आहे. त्याला सख्खी आई आणि सावत्र आई यांचे काहीही ज्ञान नाही. सुरुची या सावत्र आईचे शत्रुत्व त्याला कळले नाही. परंतु तिची शत्रूबुद्धी नाहीशी करण्याची वाट त्याला तिच्या निर्भत्सनेतूनच गवसली. ‘पित्याजवळ सिंहासनावर बसायचे असेल तर श्रीहरीची उपासना कर, प्रार्थना कर, वर मिळव,’ हा तिचा अहंकाराने केलेला उपदेश ध्रुवबाळाला अढळपदाकडे घेऊन गेला. ध्रुवपद घेऊन ध्रुव पित्याच्या राजधानीत परत आला तेव्हा सावत्र आई सुरूचीने त्याला प्रेमाने जवळ घेतले. आशीर्वाद दिले. परमात्मा ज्यावर प्रसन्न झाला त्याच्याबद्दल वैर, मत्सर, द्वेष कसा राहणार? तिचे शत्रुत्व विरून गेले.
भक्त प्रल्हादाशी साक्षात त्याच्या पित्यानेच शत्रुत्व केले. धर्मराजाने नारद ऋषींना विचारले की आपल्याच मुलाला मारायचा प्रयत्न हिरण्यकश्यपू या त्याच्या पित्याने का केला? ऋषी म्हणाले, हिरण्यकश्यपूजवळ पुत्रप्रेम होते; परंतु अहंकार आणि वैरभावना याने त्याचे मन व्याप्त झाल्याने मुलाचे प्रेम निघून गेले आणि त्याने मुलाशी टोकाचे शत्रुत्व घेतले. प्रल्हाद हा निर्वैर, शांत आणि विष्णुभक्त होता. भगवद् भक्ती करण्याची बुद्धी त्याला जन्मापासून होती. नैसर्गिक होती. त्याचे लक्ष भगवंताकडे असल्यामुळे मित्र, शत्रू हा भाव त्याच्या मनात कधी उत्पन्न झाला नाही. अशा निष्काम आणि ज्ञानी भक्ताचे रक्षण भगवंताने नरसिंह अवतार घेऊन केले. प्रल्हादावर प्रसन्न होऊन भगवान म्हणाले, ‘तुला काय हवे आहे ते मागून घे बाळ.’ तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला, ‘मनामध्ये कोणतीही वासना राहू नये आणि माझ्या पित्याने अज्ञानामुळे, तुमचे स्वरूप न जाणल्याने द्वेष व वैर केले तरीही त्यांचा उद्धार करून त्यांना मुक्त करा’. भगवंतांनी त्याला सांगितले की, तुझ्यासारखा भक्त ज्या कुळात जन्माला येतो त्याच्या मागील एकवीस पिढ्यांचा उद्धार होऊन संपूर्ण कुळ पवित्र होते. श्रीमद् भागवत सांगते की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघे पुढे रावण आणि कुंभकर्ण झाले. श्रीरामांशी शत्रुत्व केल्याने त्यांचा नाश श्रीरामांनी केला. पुढे हेच शिशुपाल, दंतवक्र झाले. त्यांनी श्रीकृष्णाचा द्वेष केला तेव्हा श्रीकृष्णाने त्यांचा शिरच्छेद केला. कृष्णाचे ते मामेभाऊ होते. परीक्षित राजाने श्री शुक्राचार्यांना प्रश्न केला आहे की भगवान श्रीकृष्ण हे मला कोणी शत्रू व मित्र नाही असे म्हणतात आणि देवांच्या रक्षणासाठी दैत्यांना का मारतात? शुक्राचार्य म्हणाले, परमात्मा सम आहे शरीरामधल्या जिवात्म्याला शत्रू, मित्र आहेत.
मानवी शरीर मिळाल्यानंतर पाप, पुण्य घडते. निर्वैर अंत:करण होण्यासाठी भगवंताची भक्ती हाच पर्याय आहे. शिशुपाल आणि दंतवक्र हे द्वेषामुळे श्रीकृष्णाशी तन्मय झाले आणि कृष्णरूप झाले. त्यांना सायुज्य मुक्ती मिळाली. तिसऱ्या जन्मात ते त्यांना मिळालेल्या शापातून मुक्त झाले. त्यांचा उद्धार होऊन ते मूळ ठिकाणी परत गेले. उद्धार झाला तेव्हाच शत्रुत्व संपले.
मृत्यूचे भय जसे शत्रू निर्माण करते तसेच अमरत्वाची खोटी कल्पना स्वत:ची शत्रू होते. मग तो तारकासूर असो वा भस्मासूर. शत्रुत्व ही एक वृत्ती आहे. ती नैसर्गिक असते. सृष्टीमध्ये उंदीर-मांजर, साप-मुंगूस, मोर-मुंगूस, वाघ आणि शेळी, कुत्रा-मांजर असे जन्मजात वैर असते. संतांच्या, ऋषींच्या आश्रमात हे वैर दिसत नाही. कारण प्रेम. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्प तया.’ सर्वांभूती परमेश्वर ही अवस्था प्राप्त झाली की षड् रिपू उरत नाहीत तेव्हा आपोआपच शत्रू देखील मित्र होतात. त्याला न वाघ खाईल न सर्प. उलट सारे एकत्र नांदतील.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या साधनाकाळामध्ये निमिषारण्यात जायचे. ते निबिड असे अरण्य होते. तेथे सूर्यकिरणे सुद्धा पोहोचणे अवघडच होते. अशा काळोखात तिथे असलेली मोठमोठी हिंस्त्र श्वापदे दिसायची सुद्धा नाहीत. त्यांना धक्का लागून महाराज पुढे गेले तरी ती श्वापदे महाराजांवर कधीही हल्ला करत नसत. कारण महाराजांच्या अंतरंगात भीती, आसक्ती, ममत्व नसून फक्त प्रेम होते. सर्वांठायी भरलेला श्रीराम हृदयात होता. जनावरांना माणसांच्या मनातली भीती त्यांच्यापासून पन्नास फूट दूर अंतरावर असतानाच कळते. तसेच प्रेम देखील त्यांना समजते. भीती असेल तर ते स्वसंरक्षणासाठी प्रथम हल्ला करतात.
माणसाचा देह हा पंचमहाभूतांचा आहे. ही पंचमहाभूते एकमेकांचे वैरी आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या भूतापासून भय आहे, असे स्वामी माधवनाथ म्हणत. पृथ्वी म्हणजे भूमी. तिच्या पोटात पाणी असूनही तिला पाणी कधी पोटात घेईल याचा नेम नाही. अग्नीला पाण्यापासून भय. पेटत्या अग्नीत पाणी टाकले की आग विझते. वायू आग भडकवतो तसा विझवतोही. पण वायूला आकाशाबाहेर पाऊल टाकता येत नाही. परंतु हीच पंचमहाभूते माणसाच्या शरीरात गुण्यागोविंदाने राहतात. कारण शरीरात वास्तव्याला असणारा परमेश्वर. त्याच्याशी शत्रुत्व ते करू शकत नाहीत. अंत:स्थ परमात्म्याला झाकून शरीरात षड्रिपू हे शत्रुत्व गाजवतात तेव्हा आपणच आपले वैरी न होता त्या परमात्म्याला जागृत करावे. म्हणजे षड् रिपूंना बाहेरचा रस्ता दिसतो. ‘शत्रूबुद्धी विनाशाय’ ही अंतर्यामीच्या प्रकाशाला रोज करावी अशीच प्रार्थना आहे.
-स्नेहा शिनखेडे