वेंगसरकर, एडलजी एमसीएचे क्रिकेट सल्लागार
वृत्तसंस्था / मुंबई
भारताचे पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि डायना एडलजी यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये दिलीप वेंगसरकर आणि डायना एडलजी यांच्या क्रिकेट सल्लागारपदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाला. मुंबई क्रिकेट संघटनेचा पाया अधिक मजबूत करण्याच्या हेतुने हा निर्णय घेण्यात आला. भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये दिलीप वेंगसरकर आणि डायना एडलजी यांना क्रिकेटचा दीर्घकालीन अनुभव असल्याने त्याचा लाभ संघटनेच्या विकास कार्यक्रमाला निश्चितच होईल. मुंबई क्रिकेट संघटनेचा आराखडा मजबूत करण्यामध्ये दिलीप वेंगसरकर आणि डायना एडलजी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी म्हटले आहे. वेंगसरकर आणि एडलजी यांनी मुंबई आणि भारतीय क्रिकेटच्या योगदानामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली असल्याने त्यांना प्रतिष्ठेचा अजीवन पुरस्कार देवून मुंबई क्रिकेट संघटनेने गौरविले होते. दिलीप वेंगसरकर व एडलजी हे भारतीय क्रिकेट क्षेत्रातील कुशल क्रिकेट प्रशासक म्हणून ओळखले जातात. 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणाऱ्या भारतीय संघामध्ये दिलीप वेंगसरकर यांचा समावेश होता. वेंगसरकरने 10 कसोटीत भारताचे नेतृत्व केले. तसेच त्यांनी 18 वनडे सामन्यातही भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. वेंगसरकर यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी तसेच बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये नियुक्ती झाली होती.