इंग्लंडची मालिकेत विजयी सलामी
विंडीजचा 8 गड्यांनी पराभव, सॉल्ट सामनावीर
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ‘सामनावीर’ फिल सॉल्टच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने यजमान विंडीजचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. सॉल्टने 54 चेंडूत 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 103 धावांची खेळी केली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 9 बाद 182 धावांपर्यत मजल मारुन इंग्लंडला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडने 16.5 षटकात 2 बाद 183 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी आरामात जिंकला.
विंडीजच्या डावामध्ये निकोलास पूरनने 29 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 38, रोमारियो शेफर्डने 22 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 35, गुदाकेश मोतीने 14 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 33, आंद्रे रसेलने 17 चेंडूत 4 षटकारांसह 30 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे शकिब मेहमूदने आपल्या 4 षटकात 34 धावांत 4 गडी बाद केले. आदिल रशिदने 32 धावांत 3 गडी बाद केले. ओव्हरटन आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडची सलामीची जोडी सॉल्ट आणि जॅक्स यांनी आक्रमक फटकेबाजी करत 23 चेंडूत 50 धावांची भागिदारी केली. सलामीच्या फिल सॉल्टने शमार जोसेफच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून आपले अर्धशतक केवळ 25 चेंडूत पूर्ण केले. तसेच त्याने मोतीच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकारही खेचला. इंग्लंडची धावसंख्या 73 असताना सलामीचा फलंदाज जॅक्स बाद झाला. जॅक्सने 10 चेंडूत 2 षटकारांसह 17 धावा जमविल्या. त्यानंतर जोस बटलर पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. बटलर बाद झाल्यानंतर इंग्लंड संघातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेकॉब बेथेलने सॉल्टला चांगली साथ दिली. डावातील 10 व्या षटकात इंग्लंडचे शतक फलकावर लागले. तर 13 व्या षटकात सॉल्ट आणि बेथेल यांची अर्धशतकी भागिदारी पूर्ण झाली. 15 व्या षटकात इंग्लंडच्या 150 धावा फलकावर लागल्या. 16 व्या षटकात बेथेलने आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच 17 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर सॉल्ट आणि बेथेल यांनी शतकी भागिदारी पूर्ण केली. सॉल्टने याच षटकामध्ये आपले शतक पूर्ण केले. डावातील 3.5 षटके बाकी असताना इंग्लंडने 2 बाद 183 धावा जमवित आपला विजय नोंदविला. बेथेलने 36 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 58 धावा झोडपल्या. विंडीजतर्फे मोती आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - विंडीज 20 षटकात 9 बाद 182 (पूरन 38, शेफर्ड 35, मोती 33, रसेल 30, शकिब मेहमूद 4-34, आदिल रशिद 3-32).
इंग्लंड 16.5 षटकात 2 बाद 183 (फिल सॉल्ट नाबाद 103, बेथेल नाबाद 58, जॅक्स 17, मोती आणि शेफर्ड प्रत्येकी 1 बळी).